देशात वाघांची संख्या वाढल्याचे २०१४च्या व्याघ्रगणनेतून दिसत असतानाच महाराष्ट्रात मात्र वाघांची संख्या समाधानकारक नसून यामागे शिकाऱ्यांनी मांडलेला उच्छादच कारणीभूत असल्याचे धक्कादायक वास्तव उघड होत आहे.
महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पात गेल्या दोन वर्षांत शिकाऱ्यांनी प्रचंड उच्छाद मांडला. पहिल्या वर्षांत ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, तर दुसऱ्या वर्षांत मेळघाट, पेंच व्याघ्र प्रकल्पांसह उमरेड-कऱ्हांडला, बोर अभयारण्याला शिकाऱ्यांनी लक्ष्य केले. गेल्या एक वर्षांत २० वाघांच्या शिकारी उघडकीस आल्या. त्यातील १४ वाघांच्या शिकारीचे प्रकरण न्यायालयात आहेत. यातील काही आरोपी पकडण्यात वनखात्याला यश आले असले तरी किमान २५ आरोपी अजूनही गायब आहेत. उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य, अकोट, मेळघाटचे काही वनक्षेत्र, तसेच ब्रम्हपुरी वनक्षेत्रातील शिकारी अजूनही उघडकीस आलेल्या नाहीत. या शिकार प्रकरणात वनखात्याच्या ताब्यात असलेला शिकारी अजित याने स्वत:च घोडाझरीतून भाऊ केरु याने वाघाचे कातडे आणल्याचे त्याच्या बयाणात सांगितले होते. तो केरु अजूनही वनखात्याच्या तावडीत सापडलेला नाही. वनखात्याने शक्य तेवढय़ा शिकारी लपवण्याचाच प्रयत्न केला. मात्र, प्रसारमाध्यमांमध्ये याची वाच्यता झाल्यानंतर शिकारीचे एक एक प्रकरण उघडकीस येऊ लागले. तत्कालीन वनमंत्री पतंगराव कदम यांनी हे शिकार प्रकरण केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडे(सीबीआय) सोपवले. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचा पुरस्कार विजेता तपास अधिकारी या प्रकरणाचा तपास करीत आहे. मात्र, त्यांनाही वनखात्याने आवश्यक ते सहकार्य केलेले नाही. नुकतीच या अधिकाऱ्याने दिल्ली येथील मुख्यालयाला यासंदर्भात तक्रार केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
महाराष्ट्रातील वाघांच्या संख्येची धुरा ज्या ताडोबा-अंधारी, पेंच, नागझिरा-नवेगाव, बोर, मेळघाट व्याघ्र प्रकल्पांवर आहे, नेमक्या त्याच व्याघ्र प्रकल्पात शिकाऱ्यांनी डाव साधला आहे. गुप्तचर यंत्रणेच्या जाळ्याची कमतरता, हे त्यामागील एक प्रमुख कारण असले तरीही, राज्याच्या वनखात्याने अलिकडच्या दोन-चार वर्षांत वन्यजीवांच्या संरक्षणापेक्षा वनक्षेत्रातील पर्यटनावरच अधिक भर दिला आहे. त्यामुळे राज्य राखीव दल किंवा विशेष व्याघ्र संरक्षण दलासारखी यंत्रणा राज्याकडे असतानाही वन्यजीव संरक्षणाऐवजी हे दल फोडून त्यांना इतर कामात गुंतवण्यात आले आहे. वाघांच्या संरक्षणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्यामुळेच राज्यात शिकारीही वाढल्या आहेत.
शिकारीने केला घात..
देशात वाघांची संख्या वाढल्याचे २०१४च्या व्याघ्रगणनेतून दिसत असतानाच महाराष्ट्रात मात्र वाघांची संख्या समाधानकारक नसून यामागे शिकाऱ्यांनी मांडलेला उच्छादच कारणीभूत असल्याचे धक्कादायक वास्तव उघड होत आहे.
First published on: 21-01-2015 at 04:20 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hunting main cause of reducing tiger in maharashtra