सावंतवाडी तालुक्यात झालेल्या चक्रीवादळाने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. पडझड झाल्याने आज तालुक्यात दोन लाख आठ हजार रुपयांचे नुकसान झाले. सावंतवाडी शहरात नगरपालिका आरोग्य निरीक्षक अनिल गावडे यांच्या घरावर झाड कोसळले, तर दाणोली-आंबोली रस्त्यावर झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतुकीचा खेळखंडोबा झाला.
सावंतवाडी शहर, सांगेली, इन्सुली, रोणापल आदी भागाला चक्रीवादळाचा तडाखा बसला. भर दुपारी झालेल्या चक्रीवादळात नगरपालिका आरोग्य निरीक्षक अनिल गावडे यांच्या घरावर झाड कोसळले. कुणालाही सुदैवाने काही झालेले नसले तरी छपराचे नुकसान होऊन घरात पाणी आले. त्यांनी तातडीने घरावरून झाड बाजूला केले.
आंबोलीत आज पावसाळी पर्यटनाचा पहिलाच दिवस. शनिवार व रविवारी पावसाळी पर्यटनाला गर्दी होते. आज गर्दी झाली होती. पावसाळी धबधब्यावर पर्यटकांनी मनमुराद आनंद लुटलाही.
आंबोली घाटमार्गावर दानोलीपासून जवळच एक झाड कोसळले. त्यामुळे वाहतूक रोखली गेली. पर्यटकही थांबले. मात्र बांधकाम खात्याने वेळीच झाड बाजूला केल्याने तासाभरानंतर वाहतूक सुरळीत झाली आणि आंबोली धबधबा पर्यटनाचा आनंद पर्यटकांनी लुटला.
आजच्या वादळी वाऱ्यामुळे घरे, मांगरांवर झाडे कोसळून सुमारे दोन लाख १० हजार रुपयांचे नुकसान झाले. तालुक्यात आतापर्यंत साडेपाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यात घरावर झाडे कोसळण्याचे प्रकार जास्त आहेत असे सांगण्यात आले.
आज दांडेली येथील रमेश खोत यांच्या घरावर झाड पडल्याने चार हजार २०० रुपये, नंदकिशोर खोत यांच्या संडासावर झाड कोसळल्याने तीन हजार ५०० रुपये, निगुडे रोणापाल येथील शांताराम गावडे यांच्या घरावर सागवानाचे झाड पडल्याने १७ हजार ५०० रुपये, निगुडे येथील उत्तम गावडे यांच्या घरावर झाड पडल्याने आठ हजार रुपयांचे नुकसान झाले.
सांगेली येथील गुरुनाथ गडकरी यांच्या घरावर आंबा झाड कोसळल्याने ३५ हजार, अंकुश सावंत यांच्या घरावर झाड कोसळल्याने २० हजार, साबा शंकर गावडे यांच्या घरावर झाड कोसळल्याने पाच हजार रुपयांचे नुकसान झाले. सोनुर्ली येथील अर्जुन साळगांवकर यांच्या घरावर झाड कोसळल्याने अकराशे रुपये, तळवणे येथील आनंद पोळजी यांच्या मांगरावर झाड पडल्याने १२ हजारांचे नुकसान झाले.
इन्सुली येथील दिलीप मंगेश पेडणेकर यांच्या घरावर माड पडल्याने ४३ हजार रुपयांचे नुकसान झाले. हे झाड तातडीने बाजूला करण्यात आले. तालुक्याला चक्रीवादळाचा जोरदार फटका बसला.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात शनिवारपासून चक्रीवादळाच्या तडाख्याने झाडे उन्मळून पडली, तसेच छपरावरील पत्रे गायब झाल्याने लाखो रुपयांची हानी झाली आहे. पाऊस कमी असला तरी वेगवान वाऱ्यांचा फटका जिल्ह्य़ाला बसला. गेल्या १५ दिवसांत सरासरी ५६२.९२ मि.मी. एवढी पावसाची नोंद झाली आहे.  महामार्ग, राज्यमार्ग व ग्रामीण मार्गावर पाऊस जोरदार कोसळला आहे.