पाण्याविना दिवसेंदिवस कासावीस होत चाललेल्या मराठवाडय़ात सध्या  आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी चांगलीच लगीनघाई चालली आहे! ‘मीच कसा लायक, योग्य उमेदवार’ हे जाहीर करण्याची स्पर्धा रंगल्याचे सध्या चित्र आहे! शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे, राष्ट्रवादीच्या सूर्यकांता पाटील, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव सातव अशा वेगवेगळ्या पक्षांतील नेत्यांना लोकसभेच्या तिकिटाचे डोहाळे लागले आहेत.  
लोकसभेच्या निवडणुकांचा फड दीड वर्षांने रंगू लागेल. परंतु नेत्यांची सध्या सुरू असलेली वक्तव्ये मात्र हा फड सुरूच झाल्याची हाळी देत आहेत. मैदानातील डाव-प्रतिडाव, चढाया, प्रतिस्पध्र्यास कमी लेखून मीच कसा योग्य हे सांगण्याची नेत्यांना घाई झाली आहे! शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी तर सेनेकडून आपणच उमेदवार, तसेच आपला विजय ठरलेलाच, असा दावा पत्रकारांशी बोलताना केला. पत्रकार बैठक कोठे का असेना, ते स्वत:ला मी राष्ट्रीय नेता आहे, असे म्हणवून घेण्यास विसरत नाहीत. औरंगाबादमध्ये मीच सक्षम आहे. मागे विलासराव देशमुख यांनीही आपल्या विरोधात निवडणूक लढविण्याविषयी असहमती व्यक्त केली होती. त्यामुळे आताही कोणी आले तरी काही फरक पडणार नाही, असा आत्मविश्वास व्यक्त करतात.   युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार राजीव सातव यांनीही हिंगोलीतून लॉबिंग सुरू केले आहे. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या राष्ट्रवादीच्या माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी राजीव सातव यांना उद्देशून, ‘राजू मला मुलासारखा आहे. त्याला लोकसभेसाठी अजून वेळ आहे,’ असे सांगत आणखी ८ वर्षे (२०२०पर्यंत) सामाजिक बांधीलकीतून उर्वरित कामे करायची आहेत, असे सांगून आपण तिकिटाच्या स्पर्धेत असल्याचे सांगितले. या अनुषंगाने सूर्यकांता पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आपणास घाई झाली नाही. काँग्रेसला मतदारसंघ पळवण्याची घाई असेल, तर हिंगोली मतदारसंघातून मैत्रीपूर्ण लढत करण्याची तयारी आहे. जे निर्णय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घ्यायचे आहेत, त्याविषयीच्या चर्चा नाहक पेरल्या गेल्या. त्यामुळे उत्तर द्यावे लागले. काँग्रेसच्या पातळीवर तर याच्याही पुढची मजल गाठली गेली आहे. पक्षाचे अखिल भारतीय निरीक्षक के. एल. दुर्गेशप्रसाद यांनी लोकसभेच्या दृष्टीने अलीकडेच मराठवाडय़ाचा चाचपणी दौरा केला. दौऱ्यात विभागाच्या आठही जिल्ह्य़ांमधील नेते-कार्यकर्त्यांशी संवाद साधला. या भेटीदरम्यान पक्षांतर्गत अनेक इच्छुकांची नावे निरीक्षकांपुढे संभाव्य उमेदवार म्हणून ठेवण्यात आली. काँग्रेसचे आमदार कल्याण काळे, विलासराव खरात, भीमराव डोंगरे (जालना) व केशवराव औताडे (औरंगाबाद) या जिल्हाध्यक्षांनी स्वत:ची  नावे इच्छुकांच्या यादीत टाकण्यासाठी खास परिश्रम घेतले. माजी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या पश्चात लातूरची उमेदवारी कोणाला मिळणार, याचीही चर्चा रंगू लागली आहे. विलासरावांचे कृपाछत्र लाभलेले विद्यमान खासदार जयवंत आवळे यांची वाट आता बिकट असल्याचे मानले जाते. आपली छाप टाकण्यात आवळे अयशस्वी ठरले. नांदेड-वाघाळा महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकावण्यात यशस्वी ठरलेल्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे महत्त्व आता पक्षाच्या तिकीटवाटपात वाढते की आणखी नवीन काही घडते, याचीही उत्सुकता आहे. या तुलनेत भाजपच्या आघाडीवर सामसूम आहे.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा