सांगली : विभक्त पत्नीच्या नावे असलेल्या दोन विमा पॉलिसी पतीनेच दोघा विमा प्रतिनिधींच्या संगनमताने मोडून परस्पर चार लाख ९७ हजार रुपये हडप केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पती व दीरासह पती- पत्नी असलेल्या दोघा विमा प्रतिनिधींवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यात राहुल अशोक माने (वय ४३) व रोहित अशोक माने (वय ३३, दोघेही रा. सुमेदा प्रसाद अपार्टमेंट, गावभाग, सांगली), विमा प्रतिनिधी शेखर स्वामी व त्याची पत्नी शोभना शेखर स्वामी (रा. सेंट्रल स्कूलमागे, वारणाली, विश्रामबाग) अशा चौघांचा समावेश आहे. याप्रकरणी श्रुती राहूल माने (वय ३९, रा. लोकल बोर्ड कॉलनी, टाटा पेट्रोल पंपनजीक, विश्रामबाग) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा…“संजय राऊत ज्या शाळेत शिकले, ती शाळा…”; नाना पटोलेंचा खोचक टोला, म्हणाले, “तुम्ही शंभर टक्के…”
विश्रामबाग पोलिस ठाण्याकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की श्रुती माने या पती राहुल माने याच्यापासून विभक्त राहतात. श्रुती माने यांनी दोन विमा पॉलिसी उतरविल्या होत्या. त्या पॉलिसीचे पैसे त्या स्वत: भरत होत्या. आपल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर या विमा पॉलिसीची खातरजमा करण्यासाठी दि. २५ सप्टेंबर २०२३ रोजी श्रुती माने विमा कार्यालयात गेल्या होत्या. तिथे चौकशी केली असता या दोन्हीही विमा पॉलिसी मुदतीपूर्वीच मोडण्यात आल्या असल्याची माहिती मिळाली.
हेही वाचा…आमदार रवी राणांचा उद्धव ठाकरेंबाबत मोठा दावा; म्हणाले, “मोदी पुन्हा सत्तेत आल्यावर १५ दिवसांत…”
याबाबत श्रुती माने यांनी अधिक माहिती घेतली असता या दोन्हीही विमा पॉलिसी मुदतीपूर्वीच पती राहूल माने यांनी मोडल्याचे व त्यापोटी जमा झालेले चार लाख ९७ हजार रुपये परस्पर काढून घेतल्याचे समोर आले. श्रुती माने यांच्या बनावट स्वाक्षरी करुन राहुल माने व अन्य तिघांनी संगनमताने फेब्रुवारी २०२१ ते दि. २५ सप्टेंबर २०२३ या कालावधीत हा अपहार केला. विमा पॉलिसी रक्कम परस्पर काढून व वापरुन आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच श्रुती माने यांनी पती, दीर व त्या दोघा विमा प्रतिनिधी यांच्याकडे विचारणा केली. मात्र या सर्वांनी श्रुती माने यांना उडवा- उडवीची उत्तरे देऊन रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे श्रुती माने यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात या चौघांविरोधात तक्रार दाखल केली आहे.