मुलगा होत नाही म्हणून पत्नीस पेटवणाऱ्या पतीस आज न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तर या प्रकरणात सासू, सासऱ्यांना दोन महिने सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. अल्ताफ बुढेलाल उर्फ दादेसाब शेख असे जन्मठेप झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्ताफ व शहिता अल्ताफ चमनशेख यांचा विवाह सन २२०७ मध्ये झाला होता. हे दोघे बाबानगर उचगाव (तालुका करवीर ) येथे राहत होते. त्यांना तीन मुली होत्या. मुलगा होत नाही म्हणून तिला सासरचे लोक छळत होते. ३० डिसेंबर २०१३ रोजी रात्री कर्नाटकात राहणारे अल्ताफचे वडील बुढेलाल चमनशेख आणि आई सरदारबी चमनशेख, ननंद महाबुबी बदनकारी यांनी अल्ताफला पत्नीस मारून टाक असे भडकावले. यावेळी झालेल्या भांडणातून अल्ताफने शाइस्ता हिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. गंभीर जखमी झालेल्या शाहीस्ता हिने रुग्णालयात पतीने पेटवून दिल्याचा जबाब दिला होता.
याप्रकरणी न्यायालयात कामकाज चालले. सरकारी वकील विवेक ह. शुल्क यांनी १४ साक्षीदार तपासले. मुलगी आरबीया, नायब तहसीलदार अनंत गुरव, डॉक्टर मकानदार डॉक्टर सत्येंद्र ठोंबरे, डॉक्टर भोई यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.
या प्रकरणी आज(गुरुवार) जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी पती अल्ताफ यास आजन्म जन्मठेप तर सासू , सासरे यांना दोन महिने सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.