पतीच्या छळास कंटाळून विवाहित महिलांनी आत्महत्या केल्याचे अनेक प्रकार घडत असतात. पण तलाठी असलेल्या पत्नीच्या छळाला कंटाळून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या व सहा महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह केलेल्या तरुण पतीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. आठ दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेबाबत आज, बुधवारी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली आहे.
तिळापूर (ता. राहुरी) येथील भरत भाऊसाहेब अचपळे (वय २७) याने तलाठी असलेल्या भाग्यश्री बाळासाहेब शिंदे हिच्याबरोबर सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह केला होता. भाग्यश्री ही राहुरी तालुक्यात तलाठी म्हणून काम करीत होती. तर भरत हा स्पर्धा परीक्षांची तयारी करीत होता. दोघांमध्ये लग्नानंतर वाद सुरू झाले. स्पर्धा परीक्षेत यश आले नाही म्हणून भाग्यश्री ही भरतला मानसिक त्रास देत असे. छळास कंटाळून भरत याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो दररोज रोजनिशी लिहीत असे. त्यामध्ये त्याने आपल्या छळाची कैफीयत लिहून ठेवली आहे. भरत हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मागे वडील व तीन बहिणी असा परिवार आहे. मृत भरतचे वडील भाऊसाहेब अचपळे (रा. तिळापूर, ता.राहरी) यांनी पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या फिर्यादीवरून सून भाग्यश्री भरत अचपळे तसेच तिची आई शैलजा बाळासाहेब शिंदे व भाऊ अिजक्य बाळासाहेब शिंदे यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. सहायक पोलीस निरीक्षक विशाल वाठुरे हे अधिक तपास करीत आहेत.

Story img Loader