अर्धापूर तालुक्यातील घटना

नांदेड : पतीने चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी आणि एक वर्षांच्या मुलाला स्वत:च्या हाताने विहिरीत ढकलून खून केल्याची घटना अर्धापूर तालुक्यातील लहान येथे रविवारी रात्री उशिरा घडली. पती स्वत: होऊन पोलीस ठाण्यात हजर झाला असून, त्याने केलेल्या खुनाची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

लहान येथील राजेश श्रीमंगले हे पत्नी अलका राजेश श्रीमंगले (वय २७) आणि मुलगी रूपाली (वय ३) व एक वर्षांचा मुलगा रूपेश यांना घेऊन सासरवाडीकडून आपल्या गावी निघाले. दरम्यान रात्री ८ वाजण्याच्या सुमारास कुटुंबासह ते अर्धापूर येथे पोहोचले. येथून लहानकडे जाताना नांदेड-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर रोडलगत असलेल्या एका पडीक विहिरीजवळ नेऊन पत्नी अलका व मुलगा रूपेश या दोघांना विहिरीत ढकलून ठार मारले. त्यानंतर मुलगी रूपालीला सोबत घेऊन तो घरी गेला. त्यानंतर मुलीला लहान येथे सोडून राजेश श्रीमंगले याने अर्धापूर पोलीस ठाणे गाठून पोलिसांना गुन्ह्यची कबुली दिली. तपास पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे हे करीत आहेत.

दरम्यान, रात्री उशिरा अलका श्रीमंगले यांचे प्रेत विहिरीच्या बाहेर काढले. मात्र छोटा मुलगा मृत रूपेश याचे प्रेत सापडले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा सोमवारी सकाळी विहिरीत गळ टाकून बाळाचे प्रेत बाहेर काढले. आई आणि मुलावर एकत्र अंत्यसंस्कार करण्यात आले.

Story img Loader