पतीच्या मृत्यूनंतर महिलांना अनेक अनिष्ट प्रथांना सामोरं जावं लागतं. समाजाकडून होणारी अवहेलना आपल्या पत्नीच्या वाट्याला येऊ नये यासाठी सोलापुरातील सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे यांनी मोठा निर्णय घेतला. करमाळा तालुक्यातील पोथरे येथील झिंजाडे यांनी पारंपारिक अनिष्ट रूढींच्या सर्व बंधनातून पत्नीला मुक्त करण्याचं ठरवलं. त्यांनी तहसीलदारांकडे १०० रुपयांच्या बाँडवर आपल्या मृत्यु पश्चात पत्नीवर अनिष्ट रूढी परंपरा लादू नये असं प्रतिज्ञापत्राच दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“पतीच्या मृत्यूनंतर विधवा महिलेचं कुंकू पुसलं जातं, मंगळसूत्र काढलं जातं, बांगड्या फोडल्या जातात. काही ठिकाणी अंगावरील दागिनेही काढून घेतले जातात. मरेपर्यंत महिलेला वाळीत टाकलं जातं. तसंच सणावाराला विधवा महिलेला आमंत्रणही दिलं जात नाही. कोणत्याही कार्यक्रमात त्यांना मान दिला जात नाही. अशा अनेक अनिष्ट रूढी परंपरा प्रथा आजही आपल्या समाजात आहेत. जग बदलत असले तरी महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार कमी झालेले नाहीत. त्यामुळे अशा प्रथांना थारा देऊ नये यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे,” प्रमोद झिंजाडे यांनी जाहीर केलं.

महाराष्ट्र सरकारने विधवा महिला सन्मान कायदा केला पाहिजे अशी मागणीही यावेळी प्रमोद झिंजाडे यांनी केली आहे. ६४ वर्षीय प्रमोद झिंजाडे आणि अलका झिंजाडे यांच्या लग्नाला ४४ वर्ष झाली आहेत. त्यांना दोन मुलं आणि एक मुलगी असा परिवार आहे. सर्व मुलं उच्चशिक्षित असून लग्नं झाली आहेत. नोकरीसाठी ते सर्व बाहेरगावी असतात.

अलका झिंजाडे यांनी पतीच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. पतीच्या आधी आपला मृत्यू व्हावा अशी भावना व्यक्त करताना त्यांनी जर तसं झालं नाही तर प्रतिज्ञापत्रात लिहिलं आहे त्याचं मी पालन करेन असं भावूक होत म्हटलं.

प्रमोद झिंजाडे यांच्या निर्णयाचं अनेकांनी कौतुक केलं असून समाजातील इतरांनीही अशाच प्रकारे पुढाकार घ्यायला हवा अशी भावना व्यक्त केली आहे. असे उपक्रम भविष्यात विधवा महिलांना सन्मान मिळवून देतील असा विश्वास प्रमोद झिंजाडे यांनी व्यक्त केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Husband signs bond to not force wife to follow widow rituals in solapur sgy