कराड : पुण्याहून पानुंद्रे (ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर) या आपल्या गावच्या यात्रेसाठी रिक्षाने निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. लोहारवाडी – येणपे (ता. कराड) येथे रिक्षा व ट्रॅक्टरच्या भीषण अपघातात रिक्षातील पती-पत्नीसह त्यांची मुलगी ठार झाली. तर, ७ वर्षांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
कराड तालुका पोलिसांनी या अपघाताची दिलेली माहिती अशी की, शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास झालेल्या या दुर्घटनेत सुरेश सखाराम म्हारुगडे (३९), त्यांची पत्नी सुवर्णा (३४) व मुलगी समीक्षा (१३) असे तिघेजण मृत पावले. तर, समर्थ सुरेश म्हारुगडे हा ७ वर्षांचा बालक गंभीर झाला असून, त्याच्यावर कराडच्या कृष्णा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. शिराळा बाजूकडून आलेल्या ट्रक्टरने रिक्षा (क्र. एमएच १४, जेपी ३०८७) या वाहनाला जबर धडक दिली. त्यात रिक्षाचा चेंदामेंदा झाला. अपघात घडताच परिसरातील लोक घटनास्थळी धावले. त्यांनी रिक्षात अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण, अपघात भीषण स्वरुपाचा असल्याने त्यात आई-वडिलांसह १३ वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला. तर, या कुटुंबातील चौथा सदस्य समर्थ म्हारुगडे हा गंभीर जखमी असल्याने त्याला रुग्णालयात पळवण्यात आले.
अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने पोबारा केला. या घटनेची फिर्याद स्थानिक पोलीस पाटलाने दिली असून, अधिक तपास कराड ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे हे करीत आहेत.