पत्नीची बदनामी करणाऱ्या पतीला तीन महिने कॅन्सर हॉस्पिटलमधील रुग्णांची सेवा करण्याची अनोखी शिक्षा सोलापूरच्या सत्र न्यायालयाने अपिलात सुनावली. एखाद्या आरोपीला रुग्णसेवेची शिक्षा देण्याचा सोलापूर न्यायालयाच्या इतिहासातील हा पहिलाच प्रसंग आहे. या खटल्याची पाश्र्वभूमी अशी, की अनुपम व राजश्री (नावे बदलली आहेत.) यांचा विवाह १९९६ साली झाला . संसारवेलीवर दोन फुलेही उमलली. परंतु मतभेदामुळे पत्नीने १९९९ साली बार्शीच्या न्यायालयात पतीविरुद्ध घटस्फोटाचा दावा दाखल केला होता. या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी १९ डिसेंबर २००२ रोजी पतीने पत्नी राजश्री ही परपुरुषाकडून तीन-चार महिन्यांची गरोदर असून तिची वैद्यकीय तपासणी करावी, अशी मागणी लेखी अर्जाद्वारे केली होती. पत्नीने स्वत:ची वैद्यकीय तपासणी करण्याची तयारी दर्शविली. तेव्हा पतीने पत्नीविरुद्ध केलेला अर्ज मागे घेतला.  पतीने केलेल्या या अर्जामुळे आपली बदनामी झाली म्हणून पत्नीने बार्शीच्या न्यायालयात पतीविरुद्ध फिर्याद दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने पतीला दोषी धरून एक महिन्याची साधी कैद व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरुद्ध पतीने सोलापूरच्या सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. या अपिलाची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांच्यासमोर झाली. या वेळी अपीलकर्त्यां पतीकडून अ‍ॅड. धनंजय माने व अ‍ॅड. जयदीप माने यांनी बाजू मांडली. तर पत्नीतर्फे अ‍ॅड. भारत कट्टे व अ‍ॅड. अजित कट्टे यांनी काम पाहिले. पतीने पूर्वग्रहदूषित भावनेने रागाच्या भरात हा अर्ज केला होता. परंतु चूक लक्षात आल्यानंतर त्याने सदर अर्ज त्याच दिवशी मागे घेतला.  अशा परिस्थितीत खालील न्यायालयाने दिलेली एक महिना साध्या कैदेची शिक्षा भोगण्यासाठी पतीला कारागृहात पाठवून काहीही उपयोग होणार नाही, असे मत व्यक्त करून न्यायाधीश पाटील यांनी पतीची कारागृहाची शिक्षा रद्द केली व त्याची चांगल्या वर्तणुकीच्या हमीपत्रावर मुक्तता केली. मात्र आरोपी पतीने तीन महिने बार्शी येथील नर्गीस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सेवा करावी, असे फर्मावले.

Story img Loader