राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच व्हावा, यासाठी तुळजाभवानी समोर नवस बोलला होता. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला तर संपूर्ण राष्ट्रवादीच्या आमदारांना घेऊन तुळजाभवानीच्या दर्शनाला येईन, असंही त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी देखील पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच होणार, असं वक्तव्य केलं होतं. आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांनी आपल्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला आहे. पुढील मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच होणार, असं त्यांनी म्हटलं आहे.
यानंतर आता शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी धनंजय मुंडे यांना खोचक टोला लगावला आहे. संबंधित वक्तव्याबाबत विचारलं असता गुलाबराव पाटील म्हणाले की, “माझा पक्ष मोठा झाला पाहिजे, असं प्रत्येक पक्षाला वाटत असतं. मलाही वाटतं की उद्धव ठाकरेंनी देशाचं पंतप्रधान व्हावं.” यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांना देखील प्रत्युत्तर दिलं होतं.
‘उद्धव ठाकरेंना मुंबई सोडलं तर महाराष्ट्रातलं काहीही माहीत नाही’ देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले की, “मुंबई हीच महाराष्ट्राची ओळख आहे. त्यामुळे साहजिकच मुंबईवर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे.”
धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?
धनंजय मुंडे आपल्या विधानात म्हणाले की, “सध्या राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. आम्ही शिवसेनेच्या माननीय मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वाखाली काम करत आहोत. राज्यात उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा आहे. पण ज्या-ज्या वेळी पक्ष वाढीच्या संदर्भात चर्चा होते. तेव्हा आम्हाला आमचा पक्ष पहिल्या क्रमांकाचा पक्ष कसा होईल, यासाठी विचार करावा लागतो. राष्ट्रवादी पक्ष पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला तर पुढील मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचा असेन, असं त्यांनी म्हटलं आहे. ते बीडमध्ये बोलत होते.