महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे १८ सप्टेबरपासून विदर्भ दौ-यासाठी रवाना होणार आहेत. त्यापूर्वी आज वांद्र्यामध्ये मनसेच्या पक्षांतर्गत बांधणीसंदर्भातील महत्त्वाची बैठक राज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे. दुपारी दोनच्या आसपास या बैठकीसाठी राज ठाकरे एमआयजी क्लब येथे पोहचले. यावेळी पत्रकारांशी चर्चा करताना राज यांनी राजकीय विषयावर भाष्य करणं टाळलं. मात्र त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये काही सूचक विधानं करताना नागपूरला ट्रेनने काय जाणार यासंदर्भात मजेशीर भाष्य केलं.
नक्की पाहा >> Photos: “राजसाहेब टेनिस खेळताना ढुंगणावर आपटले”, “हिप रिप्लेसमेंट म्हणजे दुसरी…”; राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी अन् हास्यकल्लोळ
राज ठाकरे १७ सप्टेबरला मुंबईहून रेल्वेने नागपूरकडे रवाना होतील. १८ ला सकाळी त्यांचे नागपूरला आगमन होईल. येथे त्यांचा दोन दिवस मुक्काम आहे. या काळात ते विदर्भातील पदाधिका-यांशी चर्चा करतील. २० तारखेला ते चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. याचसंदर्भात विदर्भ दौऱ्यासंदर्भात पत्रकारांनी एमआयजी क्लब बाहेर राज यांना प्रश्न विचारला. आधी पत्रकारांनी बैठकीविषयी विचारलं त्यावर राज यांनी पक्षांतर्गत निर्णयासंदर्भात बैठक असल्याने तुम्हाला फार काही मसाला मिळणार नाही. कुणीच बोलणार नाही, असं स्पष्ट केलं.
नक्की पाहा >> Photos: शिंदे गट- मनसेची जवळीक भाजपाच्या फायद्याची कारण…; BMC निवडणुकीसाठी असा आहे भाजपाचा ‘मास्टर प्लॅन’
त्यानंतर पत्रकारांनी विदर्भ दौऱ्यासंदर्भात विचारलं असता राज यांनी, “सध्या काही डबे जोडण्याचं काम सुरु आहे,” असं उत्तर दिलं. त्यानंतर एका पत्रकाराने तुम्ही नागपूरला ट्रेनने का चालले असा प्रश्न विचारला. त्यावर राज यांनी विमानाच्या वेळा या फारच पहाटेच्या असल्याचं उत्तर दिलं. “मी नागपूरला नेहमी ट्रेननेच जातो. पहाटे ५.५० ला फ्लाईट आहे. एवढ्या सकाळी उठून कोण जाईल. इतक्या सकाळी तिथं जाऊन काय करायचं?” असा प्रतिप्रश्न राज यांनी प्रश्न विचारणाऱ्याला पत्रकाराला केला. राज यांचा हा प्रश्न ऐकून पत्रकारांनाही हसू आलं.
नक्की वाचा >> राज ठाकरेंसोबतच्या भेटीत काय चर्चा झाली? मनसेसोबत युती झाल्यास पुढील प्लॅन काय? CM शिंदे म्हणाले, “राज ठाकरेंवर जेव्हा…”
त्याचप्रमाणे राज यांनी नंतर जेट लॅग टाळण्यासाठी आपण रेल्वेने जात असल्याचं सांगितलं. राज हे उपरोधिकपणे हे विधान करत असतानाच एका पत्रकाराला हे खरं वाटलं. त्यावर राज यांनी हसतच, “अरे नागपूरला कसला आलाय जेट लॅग” असं म्हणत हसतच तिथून काढता पाय घेतला.
असा असेल राज यांचा विदर्भ दौरा
२० तारखेला ते चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. २१ ला राज ठाकरे अमरावती जिल्ह्याच्या दौ-यासाठी निघतील. तेथे दोन दिवस पश्चिम विदर्भातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करतील २३ ला तेथून मुंबईकडे रवाना होतील. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होणारा राज ठाकरे यांचा दौरा मनसेत प्राण फुंकणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.