Uddhav Thackeray : काही दिवसांपूर्वी कोकणातील शिलेदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंना समर्थन दिलं. त्यानंतर कोकणातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारीही उद्धव ठाकरेंना सोडून गेले. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातील अनेक नेते सातत्याने पक्षाला रामराम ठोकून जात असल्याने उद्धव ठाकरेंना धक्क्यांवर धक्के बसत आहेत. अशा धक्क्यांमुळे मी आता धक्कापुरुष झालोय, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. कलीना मतदारसघातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी आज मातोश्रीवर जमले होते. त्यावेळी ते बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले, “माझी जपानसारखी परिस्थिती झाली आहे. जपानमध्ये असं म्हणतात की एखाद्या दिवशी भूकंपाचा धक्का बसला नाही की त्यांना आश्चर्य वाटतं. उद्धव ठाकरेंना एवढे धक्क्यावर धके बसले आहेत की मी आता धक्कापुरुष झालोय. कोण किती धक्के देतंय ते पाहूयात. “आपण असा धक्का देऊया पुन्हा हे दिसता कामा नये. “
सैनिकांकडे शिस्त असली पाहिजे
ते पुढे म्हणाले, एखादा निर्णय घेतल्यावर नाराजी असतेच. पण सैनिक म्हटल्यावर शिस्त आली पाहिजे. लढाई एकट्या दुकट्याची नाही ही लढाई आपली आहे. सगळ्यांनी छावा सिनेमा आवर्जून बघा. जे जे लोक बाहेर येतात ते डोळे पुसत बाहेर येत आहेत. डोळे उघडून सर्वांनी हा पिक्चर बघा.”
पालिकेच्या निवडणुकी एप्रिल-मे मध्ये लागण्याची शक्यता
“संघटनात्मक बांधणी करण्याचे आताचे दिवस आहेत. सुप्रीम कोर्टातील निकाल लागण्याची शक्यता आहे. २७७ किंवा २३६ चा निकाल लागेल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका एप्रिल-मे मध्ये लागण्याची दाट शक्यता आहे. मग सर्वांना दिलेले ती काम सर्वांनी करा. शाखेनुसार काम करा. विधानसभेत जो अनुभव आला तो अनुभव लक्षात घेता जी चूक झाली ती आता चूक होणार नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.