गेली ५० वर्षे महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये वास्तव्य करीत आहे. मराठी बोलू शकत नसलो तरी मला मराठी भाषेची चांगली जाण आहे. मराठी काव्याचा प्रेमी असल्यामुळेच या कविता हिंदीमध्ये नेण्याचा प्रयत्न केला असल्याचे ज्येष्ठ कवी-गीतकार गुलजार यांनी रविवारी सांगितले.
एका कार्यक्रमासाठी पुण्यात आलेल्या गुलजार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कुसुमाग्रज यांच्या कविता हिंदमध्ये अनुवादित केल्यामुळे त्या सर्वांपर्यंत पोहोचल्या. केवळ यावरच न थांबता विंदा करंदीकर, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, ग्रेस यांच्यासह नव्या पिढीतील सौमित्र (अभिनेता किशोर कदम) यांच्या कविता हिंदूीमध्ये अनुवादित केल्या आहेत. सौमित्र हा अभिनेता असल्याने त्याच्या कवितांमध्ये नाटय़मयता आहे, असेही गुलजार यांनी सांगितले.
कवी आणि गीतकार यापैकी माझ्यातील कवी मला महत्त्वाचा वाटतो. कवितेमध्ये मी माझा अनुभव मांडतो, तर चित्रपटाच्या संहितेनुसार गीताची रचना करावी लागते. त्यामुळे कवितेमध्ये मी स्वतला चांगल्या पद्धतीने अभिव्यक्त करतो असे वाटते. गुलजार पुढे म्हणाले,‘‘गेली पन्नास वर्षे मी काव्याच्या प्रांतामध्ये कार्यरत आहे. समाज बदलला. माणसांचे राहणीमान आणि कपडय़ांच्या फॅशनदेखील बदलल्या. त्यानुसार काळाप्रमाणे बदलणारा मी प्रवाही कवी आहे, अशीच माझी भावना आहे.’’    

Story img Loader