मनसेत असताना आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे सतत चर्चेत असणाऱ्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामुळे मनसेला मोठा फटका बसला आहे. राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतरच्या पहिल्याच सभेत बोलताना त्यांनी आपला पक्षप्रवेशाचा अनुभव सांगितला आहे. त्यावेळी आपल्याला ईडी कार्यालयात नेत असल्यासारखं वाटत होतं, असं त्या म्हणाल्या आहेत.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी चषक-२०२१ आयोजन बारामतीत करण्यात आलं होतं. बारामतीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार यशवंत माने उपस्थित होते. त्यावेळी रुपाली पाटील ठोंबरे बोलत होत्या. त्या म्हणाल्या, भल्याभल्यांना वाटतं की माझा राष्ट्रवादी पक्षप्रवेश पूर्वनियोजित होता. पण तसा काहीही विषय नव्हता. राष्ट्रवादीच्या मुंबई ऑफिसला मला दोघांनी नेलं. जात असताना समोर ईडीचं ऑफिस आलं आणि मला असं वाटत होतं की माझी ईडी चौकशी करायला नेत आहेत की काय?
दरम्यान, राजकारणाच्या आखाड्यात फटकेबाजी करणाऱ्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी क्रिकेटच्या मैदानातही जोरदार फटकेबाजी केली. रुपाली पाटील ठोंबरे यांनी क्रिकेट सामन्यांचा आनंद लुटला. तसेच स्वत: मैदानावर उतरून त्यांनी बॅटिंगचा देखील आनंदही लुटला असल्याचं पाहायला मिळालं. बारामतीकरांनीही त्यांना टाळ्या वाजवून दाद दिली.