सात आमदारांसह महसूलमंत्री बाळासाहेब थोरात भाजपमध्ये प्रवेश करणार, अशी सामाजिक संकेतस्थळावर सुरू असणारी चर्चा चुकीची आहे. मी काँग्रेसचाच, असे थोरात यांनी सोमवारी औरंगाबाद येथे सांगितले. जिल्हा नियोजन समितीच्या बठकीस आले असता त्यांनी हे स्पष्टीकरण दिले.
केंद्रीय वाहतूक रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांचा सत्कार करताना नगरविकास खात्याचे सचिव स्वाधीन क्षेत्रीयही उपस्थित होते. तो राजकीय औपचारिकतेचा भाग होता, मात्र छायाचित्राखाली चुकीचा मजकूर लिहिण्यात आला. मी काँग्रेसमध्येच आहे. कोठेही जाणार नाही, असे थोरात म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहू लागल्यापासून थोरात यांचे नावही चच्रेत होते. मुख्यमंत्री बदलाचा निर्णय न झाल्याने त्यांचे नाव मागे पडले. या पाश्र्वभूमीवर ते भाजपमध्ये जातील, असे वातावरण निर्माण केले जात होते. गडकरी यांच्या समवेत छायाचित्राचा उपयोग करून ते भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होती.
या पाश्र्वभूमीवर झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बठकीची माहिती देताना मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचा संदर्भ देत त्यांच्या नावामागे वारंवार माननीय असा शब्दप्रयोग ते करीत होते. पालकमंत्री म्हणून औरंगाबादच्या जिल्हा नियोजनाची ही शेवटी बठक असल्याने त्यांनी २९१ कोटी ७४ लाख रुपयांच्या आराखडय़ास मंजुरी दिल्याचे जाहीर केले. शहरातील पाणीपुरवठय़ासाठी महापालिकेने अधिक लक्ष पुरवावे, असे सांगत त्यांनी शहरासाठी समांतर पाणीपुरवठा योजनेचे काम लवकर सुरू करण्याचेही आदेश दिले.

Story img Loader