बाळासाहेब विखे पाटील काहीही करू शकतात, हा जनतेचा गैरसमज आहे. पण मी त्यांच्यापेक्षा मोठा जादूगार असल्याने त्यांची जादू या वेळी चालणार नाही, असे प्रतिपादन शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार बबनराव घोलप यांनी केले.
तालुक्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात घोलप बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपचे तालुकाध्यक्ष नितीन कापसे होते, तर शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख सुहास वहाडणे, भाजपचे दिलीप संकलेचा, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष भीमराज बागूल, राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गिधाड, भाजयुमोचे सचिन तांबे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष कमलाकर कोते, अभय शेळके आदी उपस्थित होते.
घोलप म्हणाले, बाळासाहेब विखेंचे उभे आयुष्य केंद्रात गेले, मात्र त्यांना कोणी मंत्री केले नाही. देशात एनडीएचे सरकार आले, त्या वेळी आपणच त्यांना मंत्री केले. त्यांच्या मुलालाही राज्यात मंत्री केले. भाऊसाहेब वाकचौरेंनासुद्धा गेल्या वेळी मीच उमेदवारी मिळवून दिली होती. त्यांनी गद्दारी केली. उद्धव ठाकरे म्हणाले, खासदार गेले, मला खासदार द्या म्हणून मी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे.
शिवसेनाप्रमुखांचा आदेश घेऊन येथे आलो आहे. येथील कार्यकर्त्यांचा उत्साह व त्यांच्यातील बदलाची भावना पाहिली आणि विजयाची खात्री झाली. युती शासनात समाजकल्याणमंत्री असताना ६५ टक्केदलित बांधवांना न्याय देण्याचे काम केले. राज्याच्या अर्थसंकल्पात खुले, मागासवर्गीय व आदिवासी अशा स्वतंत्र आर्थिक तरतुदी करून विकासकामे केली. या मतदारसंघात तीन मंत्री असताना कोल्हार-कोपरगाव महामार्गाच्या दुरवस्थेमुळे ९० माणसे मृत्युमुखी पडली. माझ्या विधानसभा मतदारसंघाचा मी २५ वर्षांत कायापालट केला. येथे ज्यांच्या जिवावर हे नेते मोठे झाले त्यांना पिण्याला व शेतीला पाणी नाही ही शोकांतिका आहे असे घोलप म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा