Eknath Shinde Latest Marathi News : सध्याच्या सरकारमध्ये मी नाराज नाही किंवा या नाराजीतून मी गावी आलेलो नाही, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सोमवारी दिले. तसेच रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून झालेल्या पेचातून लवकरच मार्ग निघेल, असेही शिंदे या वेळी म्हणाले.
शिंदे हे दोन दिवसांसाठी सातारा जिल्ह्यातील त्यांच्या दरे दौऱ्यावर आले आहेत. सध्याच्या सरकारमध्ये तसेच पालकमंत्री वाटपावरून शिंदे नाराज असून यातूनच ते आपल्या गावी आल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्टीकरण दिले.
शिंदे रविवारी सायंकाळी दरे (ता. महाबळेश्वर) गावी आले. पुढील दोन दिवसांत कोणाशीही संपर्क साधणार नाही, असे त्यांनी सर्वांना सांगितले होते. मात्र आजच त्यांनी नवीन महाबळेश्वर प्रकल्पासंबंधी रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि वन पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेत या योजनेचा आढावा घेतला. यानंतर माध्यमांशी बोलत सुरू असलेल्या चर्चेबाबत स्पष्टीकरण दिले.
मी नाराज नसल्याचे सुरुवातीलाच सांगत शिंदे म्हणाले, की हे महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे निवडणुकीच्या जागा वाटपापासून मंत्रिमंडळ आणि आतापर्यंत लोकांना, माध्यमांना व विरोधकांना अनेक प्रश्न पडले होते. मात्र आमच्यामध्ये कोणतीही नाराजी नाही आणि जे काही विषय असतील ते एकत्र बसून चर्चा करून त्यावर मार्ग निघेल. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून झालेल्या पेचातून लवकरच मार्ग निघेल. पालकमंत्रिपदाबाबत काही लोकांना प्रश्न आहेत. त्यांनी अपेक्षा करणे चुकीचे नाही. ज्यांनी अपेक्षा व्यक्त केल्या आहेत, त्यांनीही रायगड जिल्ह्यात मोठे काम केले आहे. यावर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून मार्ग काढला जाईल. आपण नाराज होऊन गावी आलो नसून नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या आढाव्यासाठी आलो आहे असेही शिंदे म्हणाले.
हे ही वाचा… बार्शीतील वाघाचे भय संपेना! महिन्यानंतरही वाघ मोकाट, जनावरांची शिकार सुरूच
नवीन महाबळेश्वर हा मोठा प्रकल्प आहे. या संदर्भात आढावा घेत आहे. प्रतापगडापासून पाटणपर्यंत २३५ गावे या प्रकल्पात आहेत. मात्र आता २३५ गावांसह २९५ गावांनी या प्रकल्पात समाविष्ट होण्याची मागणी केली आहे. यासाठी जे कष्ट घ्यायचे आहेत ते मी एक भूमिपुत्र म्हणून मला घ्यावे लागतील. या भागाचा कायापालट करणे हे माझे उद्दिष्ट आहे. ज्या ज्या ठिकाणी पर्यटनाला प्रोत्साहन देणे, नव्याने पर्यटन स्थळे विकसित करणे शक्य आहे, त्या त्या ठिकाणी मी पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांना भेट देण्याच्या सूचना केल्या आहेत. काही ठिकाणांना मी तर काही ठिकाणांना मुख्यमंत्री भेट देतील. इथल्या लोकांच्या जीवनात बदल करणे, येथील पर्यटन प्रकल्प विकसित करणे, त्याची जोपासना आणि वाढविणे ही माझी जबाबदारी आहे. यासाठी मी आज येथे काही अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहे.