वाई: मी सध्या सुट्टीवर नाही तर सध्या डबल ड्युटीवर आहे. अडीच वर्ष घरी बसलेल्यांनी मला सांगू नये असे मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले आहे.मुख्यमंत्री शिंदे हे सातारा येथे त्यांच्या दरे (महाबळेश्वर) गावी आहेत. विरोधकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रजेवर गेले आहेत. अशी टीका केली होती. यावर प्रतिउत्तर देत मुख्यमंत्री म्हणाले की, मी सध्या सुट्टीवर नाही तर सध्या डबल ड्युटीवर आहे. अडीच वर्ष घरी बसलेल्यांनी मला सांगू नये. असे मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी येथे आलोय,लोक भेटायला येतात. जनता दरबार घेतला. शेतीतही जातोय,शेतीची कामेही बघतोय. सातारा प्रसनाची आढावा बैठक घेतली.महाबळेश्वर पाचगणी पर्यटन सुशोभीकरण आदी अनेक कामांची बैठक घेत आहे. आगामी निवडणुका कोणाच्या नेतृत्त्वात लढवल्या जाणार यावर उत्तर देत शिंदे म्हणाले की, अजून आम्ही दिड वर्षे काम करणार आहोत. महायुती म्हणूनच आम्ही निवडणुकांना सामोरे जाणार आहोत.चिंता करु नका. गेले सात आठ महिने आम्ही जे काम केले आहे. त्यामुळे काहीजणांच्या पोटात दुखत आहे. असे शिंदे म्हणाले.

आम्ही टीकेला टीकेतून उत्तर देणार नाही. कामातून आम्ही उत्तर देणार आहोत. मी कधीही सुट्टी घेतली नाही. आता मी डबल ड्युटी करतो आहे.अडीच वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्यांना घरी बसवलं ना. त्यांच्याकडे आता काहीच काम नाही. त्यामुळे ते आरोप करत आहेत. असे शिंदे म्हणाले.

स्थानिक नागरिकांच्या संमतीशिवाय बारसु रिफायनरी प्रकल्प केला जाणार नाही. रेटून आणि अन्याय करू हा प्रकल्प केला जाणार नाही. केवळ त्यांचे मुख्यमंत्री पद गेल्याने विरोध करायचा म्हणून हे सर्व चालले आहे, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. दरम्यान त्यामुळे दोन वर्षे घरी बसलेल्यानी आमच्यावर बोलावे, हे नवलच आहे, अशी टीका त्यांनी उद्धव ठाकरेसह विरोधकांवर केली. हा ग्रीन रिफायनरी प्रकल्प आहे. या प्रकल्पातून कोणतेही प्रदूषण होणार नाही याची हमी आपल्याला देण्यात आली आहे.

बारसू ग्रीन रिफायनरीसाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले होते. त्यामुळेच पंतप्रधानांनी या प्रकल्पाला हिरवा कंदील दिला होता.ठाकरेंनी त्यावेळेस का विरोध केला नाही. त्यावेळी विशिष्ट परीस्थिती होती की विशिष्ट तडजोडी झाल्या होत्या आता मुख्यमंत्री पद गेल्यानंतर विरोध करण्याचे कारण काय अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती मुख्यमंत्र्यांनी ठाकरेवर केली आहे. दरम्यान समृद्धी महामार्गाला देखील सुरुवातीला विरोध केला होता, मात्र मी खंबीरपणे आणि जिद्दीने हा प्रकल्प पुढे नेला,असे देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. चांगल्या कामाला विरोध करणे हा दुटप्पीपणा असल्याची टीका देखील त्यांनी ठाकरेंवर केली. बारसू ही ग्रीन रिफायनरी आहे आणि यामुळे प्रदुषण होणार नाही, अशाप्रकारचे त्यांनी आश्वस्त केले आहे. बारसू या ठिकाणी रिफायनरी व्हावी, तिथल्या भागाचा विकास व्हावा, लोकांना रोजगार मिळावा, हजारो कोटींची गुंतवणूक तिकडे होऊ शकते,असे देखील मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

महाबळेश्वरच सुशोभिकरण, रस्ते,दिवाबत्ती, पर्यटन स्थळे, वाहतूक कोंडी आणि पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठीच्या बांबीवर चर्चा झाली. यावेळी जवळपास ९०० ते एक हजार कोटीचे कामे आपण मंजूर केले आहेत. तापोळामध्ये होणाऱ्या ब्रीजचे कामकाज पाहिले. तसेच तापोळा महाबळेश्वर मेन रोडचे भूमिपूजन केले असल्याची माहिती देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. यासोबतच २०२४ च्या निवडणूकीच्या मुद्यावर मुख्यमंत्री म्हणाले की, या निवडणूकीला अद्याप वेळ आहे, तो पर्यत आम्ही काम करतोय, सातआठ महिने इतकी काम केले आहे की भाजप-शिवसेना युती जिंकेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am not vacation i am on double duty said by eknath shinde in satara asj
Show comments