महाराष्ट्राचे अन्न तथा नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यास विरोध केला आहे. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावा, त्यांचा ओबीसींमध्ये समावेश करू नये, अशी भूमिका भुजबळांनी घेतली आहे. भुजबळांच्या भूमिकेनंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. सर्व स्तरातून त्यांचा विरोध केला जात आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
ओबीसी बाबतची भूमिका मांडायची तर छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे. अन्यथा त्यांच्याबाबत वेगळी भूमिका घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विचार केला पाहिजे, असं विधान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं. यावर छगन भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तुमच्या नेत्याचा ‘राजीनामा द्या’ असा एक मेसेज आला, तर मी एक क्षणही थांबणार नाही, असं मोठं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं. ते कर्जत येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
हेही वाचा- ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडेंच्या अडचणी वाढल्या, हिंगोलीत गुन्हा दाखल
राधाकृष्ण विखे पाटलांच्या वक्तव्याबाबत विचारलं असता छगन भुजबळ म्हणाले, “मला आमदारकी किंवा तुमच्या मंत्रिपदाचं काहीही अप्रुप नाहीये. मी मागील ३५ वर्षांपासून ओबीसींचं काम करत आहे. ते काम मी सोडणार नाही. जे माझ्या राजीनाम्याची मागणी करतायत, त्यांना मी सांगितलं आहे की, तुमच्या नेत्याचा ‘राजीनामा द्या’ असा एक मेसेज आला, तर मी एक क्षणही थांबणार नाही.”
हेही वाचा- “…तर छगन भुजबळ मुख्यमंत्री बनतील”, मराठा-ओबीसी वादावर बच्चू कडूंचं सूचक विधान
दरम्यान, छगन भुजबळ यांनी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या टीकेलाही उत्तर दिलं आहे. सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांनी मंत्रीमंडळात चर्चा करून प्रश्न सोडवायचे असतात. पण ते सभा आणि आंदोलनं करत आहेत, या सुळेंच्या टीकेबाबत विचारलं असता छगन भुजबळ म्हणाले, “मला ताईंना सांगायचं आहे की, मी मंत्रिमंडळातही सांगतो आहे. ज्यावेळी कुणीतरी बाहेर आंदोलन करून जनतेमध्ये बोलत आहे. त्यावेळी त्याला उत्तर देण्यासाठी मला जनतेमध्ये बोलावं लागतं. बाहेर जेव्हा कुणीतरी बीड पेटवत आहे. तेव्हा ते पेटवणं कसं चुकीचं आहे, हे जनतेपुढे नेण्यासाठी मला बोलावं लागतं.”