‘मी माझं ‘घर’ शोधतो आहे..’ माळीणच्या एका पडलेल्या घरापाशी ढिगारा उपसत तो सांगत होता. दुर्घटनेची माहिती कळल्यानंतर मुंबईहून आपल्या नातेवाइकांच्या शोधात तो आला होता. कोणतीही मदत मिळणे शक्य नाही, हे लक्षात आल्यानंतर पडलेल्या घरांमध्ये आपल्या नातेवाइकांचा शोध त्याने एकटय़ानेच सुरू केला.
माळीण गावातील दुर्घटनेची बातमी राज्यभर वाऱ्यासारखी पसरली आणि गावाबाहेर पडलेल्या लोकांनी आपल्या घराच्या, नातेवाइकांच्या काळजीने गावात धाव घेतली. शासनानेही मदतकार्य सुरू केले. मात्र, ते गावाच्या एकाच कोपऱ्यात एकवटलेले. सागर लेंभेनेही आपल्या घराच्या शोधात गावाकडे धाव घेतली. आपलं गाव, गावातील रस्ते, घर, सगळंच हरवलेलं!
आपलं घर होतं त्या ठिकाणी मदत पोहोचण्यास खूप वेळ लागणार हे लक्षात आलं आणि मग त्यानेच आपल्या घराचा शोध सुरू केला. आपल्या पडलेल्या घराचे अवशेष, सामान याचा ढिगारा उपसायला त्याने एकटय़ानेच सुरूवात केली. काठी, पत्रा अशा हाती मिळेल त्या साधनाने ढिगारा उपसताना ‘तो’ गावात राहिलेल्या नागरिकांच्या नजरेला पडत होता. सतत कोसळणारा पाऊस, डोंगरावरून येणारे पाण्याचे, मातीचे लोंढे या सगळ्यामध्ये त्याचे काम सुरूच होते.
वस्तूंची, खुणांची ओळख पटवण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता. साधारण तिशीतला सागर नोकरीनिमित्त मुंबईत असतो. त्याचे काका, काकू असे ६ नातेवाईक ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. गावात पोहोचल्यापासून तो ढिगारा उपसण्याच्या प्रयत्नात असल्याचे गावक ऱ्यांनी सांगितले.
त्याच्या नजरेतील हतबलता आणि चौकशी केल्यानंतर थंडपणे मिळणारं ‘मी माझ घर शोधतोय..’ हे उत्तर चौकशी करणाऱ्याच्या अंगावर काटा आणत होते. पण, तो मात्र आपल्या मोहिमेत गर्क होता.

Story img Loader