आपल्यावर हल्ला होऊ शकतो या आशयाचं एक पत्र मी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे पत्र लिहिलं होतं. मी बाळासाहेब ठाकरे स्कूलचा विद्यार्थी आहे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचा नाही असा टोला आता संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधत असताना संजय राऊत यांनी हा टोला लगावला आहे. मी सुरक्षा मागितली नाही, मी एकटाच फिरतोय आणि एकटाच नडतोय असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे संजय राऊत यांनी?
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना आपल्यावर हल्ल्याची भीती वाटते. प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाला. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला करण्याची सुपारी देण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना हे सगळं घडतं आहे. तसंच राज्यात रोज खून, दरोडे आणि बलात्काराच्या घटना घडत आहेत. लोकप्रतिनिधीही सुरक्षित नाहीत. मला सुरक्षेची गरज नाही. उलट त्यांना कुणाला सुरक्षा लागत असेल तर मी ती देईन. मी एकटाच फिरतो आणि लढतो असंही राऊत यांनी स्पष्ट केलंय. एवढंच नाही तर गृहमंत्री हे पद जनतेला सुरक्षित करण्यासाठी हवं, फुटीर आमदारांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सुरक्षा पुरवण्यासाठी नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मी बाळासाहेब ठाकरे स्कूलचा विद्यार्थी
“आपण गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना कळवले. सुरक्षा मागितलेली नाही. मी बाळासाहेब ठाकरे स्कूलचा विद्यार्थी आहे, रामभाऊ माळगी प्रबोधिनीचा नाही, फडणवीस यांना मी सुसंस्कृत समजत होतो, आता नाही.”, अशी टीका राऊतांनी केली. मला सनसनाटी निर्माण करायची गरज नाही. उलट फडणवीस हे अत्यंत बेफिकीरपणे वागत आहेत. ते इतरांचं बुद्धीचे माप काढतात, मी त्यांच्या बुद्धीचे माप काढायला लागलो, तर गडबड होईल, असे राऊत म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांनी काय म्हटलं होतं?
संजय राऊत यांना विनाकारण प्रसिद्धीची सवय लागली आहे. विनाकारण कुठला तरी आरोप करायचा आणि प्रसिद्धीत राहायचं. २ हजार कोटींचा आरोप केला. एक पुरावा त्यांच्याजवळ नाही. अलिकडे संजय राऊत एवढे बिनडोक आरोप करतात की काय उत्तर द्यायचं? रोज खोटं बोलल्याने सहानुभूती मिळत नाही. चुकीचे आरोप लावल्याबद्दल संजय राऊत यांच्यावर कारवाईची मागणी केली जाईल असं मला वाटतं आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.