वर्षांतील ३६५ दिवस २४ तास कधीही हाक मारा, मी तुमच्या सेवेसाठी हजर आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी सातारकरांना आश्वासन दिले. येथील गांधी मदानावर लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे यांच्या प्रचाराची सांगता सभा झाली. या सभेत उदयनराजे बोलत होते. या वेळी व्यासपीठावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
उदयनराजे म्हणाले की, आघाडी सरकारने अनेक लोकहिताचे निर्णय घेतले, अनेक कामे मार्गी लावली आहेत. दुसरीकडे ज्याने स्वत:चा पक्ष संपुष्टात आणला, तो पंतप्रधान व्हायला निघाला आहे. मी खूप भाग्यवान आहे. मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्यासह पालकमंत्री आणि सर्व आमदार माझे मतदार आहेत. मी तुमचा सेवक असून तुम्ही कधीही मला हाक द्या, मी तुमच्या सेवेसाठी हजर आहे, असेही ते म्हणाले.
या वेळी शिंदे म्हणाले की, आजच्या सभेला आर. आर. पाटील येणार होते. मात्र ते येऊ शकले नाहीत. मात्र दोन राजे आणि पवार यांनी मला इथे रखवाली करण्यासाठी पाटील म्हणून नियुक्त केले आहे. उदयनराजेंच्या विरोधात १७ उमेदवार आहेत. ठरवले असते तर निवडणूक बिनविरोधही झाली असती. पण मग नंतर साताऱ्यात लोकशाही नाही, असे सगळे म्हटले असते.
‘चोरांना त्यांची जागा दाखवून द्या’
आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी आपल्या भाषणात ‘आप’चे उमेदवार राजेंद्र चोरगे यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली. आजची ही सभा उदयनराजेंच्या विजयाची सभा आहे. केवळ गुलाल पडण्याची औपचारिकता बाकी आहे. विरोधी उमेदवारांची चिन्हे बघितली तर सर्व घरात ठेवण्याच्या वस्तू आहेत. फक्त घडय़ाळ हातात राहते. काही जण आमच्यात आणि जनतेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. कोणीही असू द्या, आमच्या तिन्हीपकी कुठल्यातरी एका वाडय़ामुळेच ते मोठे झालेले आहेत, हे त्यांनी विसरू नये. अशा चोरांपुढे आम्ही काहीही मान्य करणार नाही. जनतेसमोर आम्ही आमच्या चुका मान्य करू. हे चोर आमच्यात आणि जनतेत काहीही झाले तरी फूट पाडू शकत नाहीत. हे चोर निवडणुकीत उभे राहिले आहेत. या चोरांना त्यांची जागा दाखवून द्या, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी या वेळी केले.
या वेळी आ. बाळासाहेब पाटील, डॉ. दिलीप येळगावकर, आनंदराव पाटील, आ. विलासराव पाटील उंडाळकर, धर्यशील पाटील इत्यादींची भाषणे झाली.
मी तुमचाच सेवक – उदयनराजे
वर्षांतील ३६५ दिवस २४ तास कधीही हाक मारा, मी तुमच्या सेवेसाठी हजर आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी सातारकरांना आश्वासन दिले.
First published on: 16-04-2014 at 03:35 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I am your servant udayanraje