घरामध्ये बसून मी करोना संकटाच्या कालावधीमध्ये राज्यात १६ हजार कोटींची गुंवणूक आणली आहे, असं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. राज्यातील उद्योगधंदे, गुंतवणूक, करोना कालावधीनंतर राज्यातील आर्थिक परिस्थिती यासंदर्भातील प्रश्नांना उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे. शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची विशेष मुलाखत घेतली. याच मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी राज्य सरकार हातवर हात धरुन बसलेले नाही असं सांगितले आहे. राज्यातील गुंवणुकीबद्दल भाष्य करताना त्यांनी जून महिन्यामध्ये राज्याच्या उद्योग विभागाच्यावतीने मॅग्नेटीक महाराष्ट्र २.० (भाग दोन) अंतर्गत १२ देशांतील गुंतवणुकदारांसोबत १६ हजार ३० कोटी रुपयांचे सामंजस्य कराराचा संदर्भ देत विरोधकांना घरातूनही काम करता येतं असं सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की वाचा >> उद्धव ठाकरेंनी सांगितलं करोना काळामध्ये मंत्रालयात न जाण्याचं कारण, म्हणाले…

“महाराष्ट्रामध्ये जी १६ हजार कोटींची एमओयूची गोष्ट आहे ती मी घरात बसून केली आहे. मी कुठेही इकडे तिकडे फिरत बसलो नाही. जी सिस्टीम उपलब्ध आहे तिच्या माध्यमातून हे घडवून आणलं. काम करणारी सिस्टीम कार्यरत असली की काम होतात. त्या कराराच्या वेळी काहीजण त्यांच्या देशातून सहभागी झाले होते. आपली काही लोकं ज्यामध्ये मी घरातून होतो, देसाई साहेब (उद्योगमंत्री सुभाष देसाई) आणि इतर सहकारी मंत्रालयातून सहभागी झाली होती,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. करोनाच्या पार्श्वभूमीवर काही आठवड्यांपूर्वी पार पडलेली सर्व पक्षीय बैठक असो किंवा इतर आढावा बैठकी असो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घराबाहेर पडत नाहीत अशी टीका करणाऱ्या अनेक पोस्ट सोशल मिडियावर विरोधकांनी मागील काही कालावधीमध्ये व्हायरल केल्याचे पहायला मिळालं होतं. त्याचसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य करत विरोधकांना नाव न घेता टोला लगावला आहे.

नक्की वाचा >> “आम्हाला मुंबई – नागपूर अशी बुलेट ट्रेन द्या, त्यामुळे…”; मोदी सरकारकडे उद्धव ठाकरेंची मागणी

राज्यामध्ये अधिक अधिक गुंतवणूक व्हावी म्हणून…

पुढे बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यामध्ये अधिक गुंतवणूक येण्यासाठी काय प्रयत्न केले जात आहेत याची माहिती दिली.  “आता राज्यापुरतं बोलायचं झालं तर सध्या अनिश्चितता नाही. आपण अनेक साऱ्या गोष्टी आणि सोयीसुविधा उभारत आहोत. मात्र हे सर्व काही आपण गोष्टी गहाण टाकून करत आहोत अशातली गोष्ट नाहीय. पण आपण अनेक नियम अधिक सोपे करत आहोत. जमिनीसंदर्भातील नियम असतील किंवा इज ऑफ डुइंग बिझनेस (उद्योगधंद्यांसाठी पोषक वातावरण निर्माण करणे) यासारख्या गोष्टींवर सरकार काम करत आहे. हे सर्व पाहिल्यावर जे एमओयू केले आहेत ते अंमलात आणण्याची जबाबदारी सरकारी आहे. सरकार जे काम करत आहे आणि जे वातावरण तयार केलं आहे त्यातून जो विश्वास निर्माण झाला आहे त्यामुळे ही गुंवणूक नक्कीच राज्यात येईल. ही गुंवणूक येत असताना आधीचे जे उद्योगधंदे आहेत ते काम करत आहेत. मात्र पुन्हा परिस्थिती बिघडल्यास हे उद्योगधंदे लॉकडाउनच्या माध्यमातून काही काळ बंद ठेवण्याशिवाय इतर दुसरा तात्पुरता पर्याय उपलब्ध नाहीय,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.  “सगळं काही संपलं आहे असा विचार करण्याची गरज नाही. मी स्वत: निराशावादी नाही आणि मी कोणाला निराशावादी होऊ देणार नाही,” असा विश्वास व्यक्त करत राज्याची आर्थिक घडी व्यवस्थित करण्यासंदर्भातील काम सुरु असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी मुलाखतीमध्ये दिली.

नक्की वाचा >>  “उद्योगधंद्यांबद्दल सरकारी धोरणे योग्य नसतील तर…”; मोदी सरकारवर उद्धव ठाकरेंचा निशाणा 

१५ जून रोजी मॅग्नेटीक महाराष्ट्र २.० (भाग दोन) अंतर्गत झाले करार

१५ जून रोजी मॅग्नेटीक महाराष्ट्र २.० (भाग दोन) अंतर्गत अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर आदी देशांतील तसेच काही भारतीय गुंतवणुकदारांसोबत राज्य सरकारने सामंजस्य करार केले आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई हे या कार्यक्रमाला व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते. या दोघांनाही या सामंजस्य करारावर महाराष्ट्र सरकारच्यावतीने स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

चिनी कंपन्यांबरोबरचे करार होल्डवर

महाराष्ट्र सरकारने मॅग्नेटीक महाराष्ट्र २.० (भाग दोन) अंतर्गत चीनच्या तीन कंपन्यांशी करार केला होता. यामध्ये हेंगली इंजिनिअरिंग ही चिनी कंपनी तळेगावमध्ये आपला कारखाना सुरु करणार होती. या माध्यमातून पुण्यातील औद्योगिक पट्ट्यामध्ये २५० कोटींची गुंवणूक करुन १५० जणांना रोजगार उपलब्ध होणार होता.  त्याचप्रमाणे चीनमधील ग्रेट वॉल मोटर्स ऑटोमोबाईल कंपनी तळेगावमध्येच तीन हजार ७७० कोटींची गुंतवणूक करुन २ हजार ४२ स्थानिकांना रोजगार देणार होती. पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्यूशन जेव्ही विथ फोटोन या तिसऱ्या चिनी कंपन्याबरोबरही १००० कोटींचा करार करण्यात आला होता. ही कंपनी तळेगावमध्ये कारखाना सुरु करणार होती. या कंपनीच्या माध्यमातून १५०० जणांना रोजगार मिळणार होता. मात्र करार झाल्याच्या कालावधीमध्ये म्हणजेच १४ जून रोजी भारत चीन सैन्यादरम्यान लडाखमधील गलवान येथील झालेल्या झटापटीमध्ये २० भारतीय जवान शहीद झाल्याने महाराष्ट्र सरकारने केलेल्या करारामध्ये सहभागी असलेल्या चिनी कंपनी सोबतचा करार स्थगित केले आहेत. चिनी कंपन्यांबरोबरच करार होल्डवर असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी मुलाखतीमध्ये दिली आहे.

नक्की वाचा >> “त्यांनी त्यांचा महाराष्ट्राचा फंड दिल्लीत दिला असल्याने ते…”; उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर टीका

सामंजस्य करार झालेल्या कंपन्या आणि गुंतवणूक रक्कम पुढीलप्रमाणे आहे :

एक्सॉन मोबिल(अमेरिका)ऑइल अँड गॅस- इसाम्बे, रायगड ७६० कोटी

हेंगली (चीन) इंजिनिअरिंग- तळेगाव टप्पा क्रमांक-२, पुणे २५० कोटी आणि १५० रोजगार (हा करार चिनी कंपनीशी असल्याने सध्या या कराराला स्थगिती देण्यात आली आहे)

असेंडास (सिंगापूर) लॉजिस्टिक- चाकण-,तळेगाव, पुणे, भिवंडी, ठाणे ५६० कोटी

वरूण बेव्हरिजेस (भारत) अन्न प्रक्रिया- सुपा, अहमदनगर ८२० कोटी

हिरानंदानी ग्रुप (भारत) लॉजिस्टिक- भिवंडी- चाकण तळेगाव १५० कोटी आणि २५०० रोजगार

असेट्ज (सिंगापूर)डेटा सेंटर- टीटीसी, ठाणे- महापे ११०० कोटी आणि २०० रोजगार

इस्टेक (दक्षिण कोरिया) इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीम डिझाईन – रांजणगाव, पुणे १२० कोटी आणि ११०० रोजगार

पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्यूशन जेव्ही विथ फोटोन ( चीन) ऑटो-तळेगाव १००० कोटी रोजगार १५०० (हा करार चिनी कंपनीशी असल्याने सध्या या कराराला स्थगिती देण्यात आली आहे)

इसाम्बे लॉजिस्टिक (भारत) लॉजिस्टिक- रायगड १५०० कोटी आणि रोजगार २५००

रॅकबँक(सिंगापूर) डेटा सेंटर- ठाणे, हिंजेवाडी, पुणे १५०० कोटी

युपीएल( भारत) केमिकल- शहापूर, रायगड ५००० कोटी आणि रोजगार ३०००

ग्रेट वॉल मोटर्स (चीन) ऑटोमोबाईल तळेगाव- पुणे ३७७०० कोटी आणि २०४२ (हा करार चिनी कंपनीशी असल्याने सध्या या कराराला स्थगिती देण्यात आली आहे)

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I brought 16000 crore investment in maharashtra by working from home says cm uddhav thackray scsg