माझे आईवडील काँग्रेसमध्ये आहेत, म्हणून मी देखील काँग्रेससमध्येच असले पाहिजे असे नाही. राजकारणात प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य आहे. मी माझा निर्णय घेण्यास समर्थ आहे, असे सूचक विधान राज्यातील काँग्रेस नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांनी केले आहे. मला स्वतंत्र नेतृत्व मान्य असेल तर मी त्या नेतृत्वाकडे जाईन मग भले मला माझ्या कुटुंबीयांचा विरोध असला, तरी मी थांबणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. या विधानानंतर सुजय विखे हे भाजपात जाणार की काय, अशी चर्चा रंगली आहे.

अकोले तालुक्यातील निळवंडे कालव्याची बंद पडलेली कामे पूर्ववत सुरू करण्यासाठी राहाता तालुक्यातील सर्व लाभधारक शेतकऱ्यांच्यावतीने डॉ.सुजय विखे यांच्या नेतृत्वाखाली राहाता तहसील कार्यालयासमोर बुधवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी पत्रकारांशी बोलताना सुजय विखे यांनी भाजपाविषयी सूचक विधान केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विखे कुटुंबीयांचे असलेले जवळचे संबंध याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, माझे वडील काँग्रेस पक्षाचे आहेत, ते राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत, आईपण काँग्रेस पक्षात असून त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आहेत. तो माझ्या आई वडिलांचा पक्ष आहे. पण मला स्वतंत्र नेतृत्व मान्य असेल तर मी त्या नेतृत्वाकडे जाईन, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, निळवंडे धरणाच्या कालव्यांसाठी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी साईबाबा संस्थानकडून पाचशे कोटीचा निधी संस्थान व राज्य सरकारच्या माध्यमातून मिळवला. यातून निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे काम टेलपर्यंत निश्चित होईल. तुम्ही फक्त कालव्यात पाणी सोडा, शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचवायचे ते राधाकृष्ण विखे पाहतील. वेळप्रसंगी स्वत:च्या खर्चातून ही कामे करू, असे आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले.

Story img Loader