शिवसेनेच्या उद्धव बाळासाहे ठाकरे गटातील आमदार राजन साळवी यांच्या कुटुबाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) चौकशीसाठी बोलावलं आहे. यासाठी एसीबीने साळवी कुटुंबियांना नोटीस पाठवली आहे. साळवी यांची पत्नी, मोठा भाऊ आणि वहिनीला नोटीस बजावण्यात आली आहे. साळवी कुटुंबाची २० मार्च रोजी रायगड येथील एसीबीच्या कार्यालयात चौकशी केली जाणार आहे.
आमदार राजन साळवी हे गेल्या दोन महिन्यांपासून एसीबीच्या रडारवर आहेत. याआधी तीन वेळा साळवी यांना चौकशीसाठी एसीबीने बोलावलं होतं. आता त्यांच्या कुटुंबाची चौकशी केली जाणार आहे. कुटुंबाला आलेल्या एसीबीच्या नोटीशीची माहिती स्वतः राजन साळवी यांनी माध्यमांना दिली.
या सरकारला माझा शाप आहे : साळवी
एसीबीच्या नोटीशीबद्दल साळवी म्हणाले की, “जे आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले त्यांना सरकारी संस्थांच्या माध्यमातून नोटीसा पाठवल्या आहेत. परंतु जे लोक भाजपात किंवा शिंदे गटात गेले त्यांना नोटिसा येत नाहीत. तिकडे गेले की सर्व नेते वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ होतात आणि आम्हाला दोषी ठरवलं जातं. देशात आणि राज्यात त्यांचं सरकार आहे. सर्व केंद्रीय यंत्रणा त्यांच्या ताब्यात असल्यामुळे आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणून या सरकारला माझा शाप आहे.”
हे ही वाचा >> “विरोधकांना बोलायला जागाच ठेवली नाही”; उद्धव ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर
दरम्यान, साळवी म्हणाले की, “तुमचं टार्गेट मी आहे आणि तुम्ही मला नोटीस पाठवली तर माझ्या माध्यमातून माझ्या कुटुंबाला त्रास देऊ नका. तसेच माझ्या भागातले स्थानिक ठेकेदार आणि सरपंचांना त्रास देऊ नका.”