मी राजकारणात कुणालाही शत्रू मानत नाही. असं सूचक वक्तव्य आज शरद पवार यांनी नाशिकच्या पत्रकार परिषदेत केलं आहे. आज शरद पवार हे येवला या ठिकाणी सभा घेणार आहेत. त्याआधी ते नाशिकमध्ये आले. तिथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी आगामी काळात तुमचा प्रतिस्पर्धी कोण? आत्ता पक्ष सोडून गेलेले लोक, की भाजपा? असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावेळी शरद पवार यांनी हे उत्तर दिलं आहे.
काय म्हटलं आहे शरद पवार यांनी?
“मी राजकारणात कुणालाही शत्रू मानत नाही. राजकारणात मतभेद असतात, मतभिन्नता असते. पण त्याचा अर्थ शत्रुत्व असतं असा नाही. “
हे पण वाचा “मी कुठल्या वयात निवृत्त व्हायचं? कुठे थांबायचं….”, शरद पवारांचा अजित पवारांना यांना थेट सवाल
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर आनंद
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे काय निर्णय घेतील ते त्यांच्यावर आहे पण कुणी एकत्र असेल तर आनंद आहे असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. एवढंच नाही तर राजकारणाचा चिखल झाला असला तरीही त्यात बियाणं टाकायचं असतं असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांचा मला अभिमान
आव्हाड आणि जयंत पाटील पक्षाचे अडसर आहेत का? असा प्रश्न विचारला असता, “पक्षाच्या बऱ्या वाईट काळात भक्कपणे, स्वतःच्या करिअरचा विचार न करता, पक्षाच्या विचारधारेसाठी पडेल ते करणारे हे लोक आहेत. त्यामुळे त्यांचा आम्हाला अभिमान आहे” असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
हे पण वाचा- “ना टायर्ड हूँ! ना रिटायर्ड हूँ”, वाजपेयींच्या ओळी उच्चारत शरद पवारांचा अजित पवारांना टोला
मी नाशिकपासूनच सुरुवात का केली?
मी नाशिक निवडलं? कारण स्वातंत्र्याच्या इतिहासात नाशिकचं वेगळं महत्व आहे. तसंच काँग्रेसच्या इतिहासातही नाशिकचं वेगळं महत्त्व आहे. अनेक उत्तम मार्गदर्शक या शहराने दिले आहेत. तसंच आणखी एक गोष्ट अशी आहे की आम्ही सगळे जण जी पिढी राजकारणात पडली त्यांचा आदर्श यशवंतराव चव्हाण होते. त्यावेळी चीनचं संकट देशावर आलं आणि त्यांना नेहरुंनी दिल्लीत बोलवलं. त्यांना संरक्षण मंत्री केलं. चव्हाण यांचा पहिला लोकसभेतला प्रवेश नाशिकमधून झाला. ही नाशिकची पार्श्वभूमी आहे त्यामुळे मी इथून सुरुवात केली आहे असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.