केवळ सन्मानासाठी कोणावरही मृत्यूच्या तोंडी जाण्याची वेळ येऊ नये, अशी भावना प्रख्यात अभिनेता शाहरुख खानने व्यक्त केलीये. दिल्लीतील सामुहिक बलात्कारातील बळी ‘निर्भया’ला शुक्रवारी अमेरिकी सरकारतर्फे मरणोत्तर सन्मानाने गौरवण्यात येणार आहे. हाच धागा पकडून बोलताना शाहरुख म्हणाला की, महिलांना त्यांच्या कर्तृत्वाबद्दल, त्यांच्या यशाबद्दल वेळोवेळी सन्मानित केले पाहिजे. मात्र, सन्मानासाठी कोणावरही मृत्यूला सामोरे जाण्याची वेळ ओढवू नये.
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची पत्नी मिशेल ओबामा आणि परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांच्या हस्ते शुक्रवारी विशेष कार्यक्रमात जगातील धैर्यवान महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यामध्ये यंदा भारतातील निर्भयाचाही समावेश आहे.
शाहरुख म्हणाला, अमेरिकी सरकार निर्भयाच्या लढ्याचा सन्मान करीत आहे, हे निश्चितच चागले आहे. पण सन्मानासाठी मृत्यूला सामोरे जाण्याची माझी अजिबात इच्छा नाही. कोणत्याही महिलेवर किंवा पुरुषावर ही वेळ येऊ नये. अर्थात त्यांना त्यांच्या कामगिरीबद्दल यथोचित सन्मान नक्कीच मिळाला पाहिजे.