एकनाथ शिंदेंनी २१ जून २०२२ ला शिवसेनेत बंड केलं. शिवसेनेतल्या काही आमदारांसह त्यांनी सूरत गाठलं होतं. ही संख्या नंतर ४० वर गेली. शिवसेनेचे ४० आमदार आणि १० अपक्ष आमदार हे एकनाथ शिंदेंबरोबर गेले. एकनाथ शिंदेंनी थेट उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिलं होतं. त्यानंतर २९ जून २०२२ च्या दिवशी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला ज्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळं. त्यानंतर ३० जून २०२२ ला एकनाथ शिंदेंनी भाजपाच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हा सगळा घटनाक्रम महाराष्ट्र विसरलेला नाही. अशात अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आता गुवाहाटीला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरेंना फोन केला होता असं म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले बच्चू कडू?

“अमरावती लोकसभा निवडणुकीत आम्ही पाठिंबा दिलेला उमेदवारच निवडून येणार आहे. नवनीत राणा निवडून येणार नाहीत. टेक्निकल काय निकाल लागतो ते माहीत नाही. सट्टा बाजारात कुणाचा काहीही भाव असला तरीही आम्ही ज्या प्रकारे आम्ही प्रचार केला त्यामुळे आमचा विजय पक्का आहे. शेतकरी, मजूरवर्ग यांचे प्रश्न आम्ही मांडले आहेत. ही निवडणूक आम्ही जिंकलो आहे आता ४ तारखेला चित्र स्पष्ट होईल” असं बच्चू कडू म्हणाले आहेत.

हे पण वाचा- “महायुतीला भरघोस यश मिळणे अशक्य,” बच्चू कडूंचा घरचा अहेर; म्हणाले…

आम्ही बाजी पलटवू शकतो

“रंगपंचमी आली तेव्हा आम्ही एक घोषणा लिहिली होती निवडणूक आली आता मुद्द्यावर बोला ते आम्हाला दाखवून द्यायचं होतं. आम्ही बाजी उलटवू शकतो हे दाखवून द्यायचं होतं. उमेदवाराचं भवितव्य मतपेटीत बंद आहे. पण निकाल आमच्या बाजूने लागेल याची खात्री आहे. मतपेटीतली मतं आम्हाला मिळणार आहे. नवनीत राणांचा पराभव होणार आहे. रवी राणाच त्यांना पडणार आहे हे काही सांगायची आवश्यकता नाही. रवी राणाने दोन वर्षे वगैरे गप्प बसले असते तर चित्र वेगळं दिसलं असतं” असंही बच्चू कडू म्हणाले.

उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता

“मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता. तेव्हा त्यांची बोलण्याची मानसिकता नव्हती. कारण बरेच आमदार तिकडे पोहचले होते. उद्धव ठाकरेंनी माझा फोन उचलला, माझ्याशी बोलले पण फार काही बोलू शकले नाहीत. त्यामुळे मी फोन ठेवून दिला. राजकारणात काहीही घडू शकतं. पाच वर्षांमधल्या घडामोडी पाहिल्या तर हे लक्षात येतं. तसंच यावेळी आपण पाहिलं की बाळासाहेब ठाकरेंचा फोटो सगळ्यांच्या बॅनरवर होता. एक गोष्ट मान्य करावी लागेल की राजकारणात कुणी कुणाचा शत्रू नसतो, भाऊ नसतो. छत्रपती शिवरायांचे वडील शहाजीराजे यांचे चुलत बंधू त्यांच्याविरोधात लढत होते. जनतेने राजकारण मनावर घेऊ नये, त्यांनी मतदान मनावर घेतलं पाहिजे. जनता अनेकदा हे विसरते” असंही बच्चू कडू म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I had called uddhav thackeray before leaving for guwahati but he was not in the mood to listen said bacchu kadu scj