प्रतिभा पाटील यांचे स्पष्टीकरण
सेवेतील मुदतवाढीपेक्षा आपण राष्ट्रसेवेला प्राधान्य द्यावे असा सल्ला तिन्ही सेनादलांचे प्रमुख या नात्याने आपण माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंग यांना दिला होता, असे माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. माजी लष्करप्रमुख सिंग यांच्या आत्मचरित्रात तत्कालीन राष्ट्रपतींनी लष्करप्रमुखपद न सोडण्याचा सल्ला दिल्याचे म्हटले आहे. यावर पाटील यांनी येथे आपली बाजू मांडली.
जन्मतारखेच्या मुद्दय़ावरून सिंग यांनी न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. या माध्यमातून लष्करी सेवेत मुदतवाढ मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न होता. या कारणास्तव संरक्षण मंत्रालयाशी त्यांनी न्यायालयीन लढाई सुरू केली. जन्मतारखेच्या मुद्दय़ावरून वाद उद्भवल्यानंतर तत्कालीन राष्ट्रपतींनी लष्करप्रमुखपद न सोडण्याचा सल्ला आपणास दिला होता, असे सिंग यांनी आत्मचरित्रात म्हटले आहे. विविध कार्यक्रमांनिमित्त नाशिक दौऱ्यावर आलेल्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी शुक्रवारी त्यावर आपले मत मांडले. जन्मतारखेच्या मुद्दय़ावरून वाद निर्माण झाल्यावर सिंग आपला सल्ला घेण्यास आले होते. त्या वेळी आपण त्यांना सेवेतील मुदतवाढीपेक्षा राष्ट्रसेवा महत्त्वाची असल्याचे सूचित केले होते, असे पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, जनमत चाचण्यांवरून देशात सध्या बरेच वादळ उठले आहे. काँग्रेसने या चाचण्यांना प्रखर विरोध दर्शविला असला तरी भाजप त्यांचे समर्थन करत आहे. या संदर्भात विचारणा केली असता पाटील यांनी कोणतेही भाष्य केले नाही. प्रत्येकाची मते वेगवेगळी असू शकतात, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री वा तत्सम महत्त्वपूर्ण पदांसाठी महिलांचा विचार होत नसल्याच्या प्रश्नावर पाटील यांनी राजकीय गणिते वेगळी असल्याचे मत व्यक्त केले. महिलांमध्ये त्या पदांवर काम करण्याची क्षमता आहे. त्यांनी आत्मविश्वास वाढविणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी नमूद केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा