सांगली: मी कोणाकडून पैसे घेतलेले नाहीत, यामुळे मला रात्री शांत झोप लागते. या पृथ्वीवर माझ्या नावावर एकही घर नाही. यामुळे ईडी चौकशीची आपल्याला काहीच वाटत नाही असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी सांगितले.
नेर्ले (ता. वाळवा) येथील विकास सोसायटीच्या इमारतीचे उद्घाटन आ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष आ. मानसिंगराव नाईक, राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, सरपंच संजय पाटील, सोसायटीचे अध्यक्ष दिलीप पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. पाटील म्हणाले, माझ्या नावावर अख्ख्या पृथ्वीवर एकही घर नाही. सांगलीतील घर वडील राजारामबापू पाटील यांच्या नावाने होते. त्यांच्या पश्चात ते घर आईच्या नावे झाले असून आता आईच्या पश्चात नाव बदलण्याचे काम सुरू आहे. कासेगावमध्ये थोडीफार शेती आहे. मात्र, वाटण्या झालेल्या नाहीत.
सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणे काम करण्यावर आपण भर देत आलो आहे. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात बोलणार्यांना अडकविण्याचे काम सध्या सुरू असून मी अशा चौकशीला भिण्याचे कोणतेच कारण नाही. सत्ताधारी भाजप विरोधात लोकामध्ये तीव्र असंतोष असून आता आपण केवळ निवडणुकीचीच वाट पाहात आहोत. या निवडणुकीत मतदारच योग्य ते उत्तर देतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.