राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकला असून भाजपात जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याबरोबर आणखी काही आमदारांचीही नावे जोडली जात आहेत. त्यामध्ये अस्लम शेख यांचाही समावेश आहे. अशोक चव्हाणांसह मालाड पश्चिम मतदारसंघाचे आमदार अस्लम शेख यांनीही राजीनामा दिल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले आहेत. मात्र या वृत्तावरून अस्लम शेख यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
“मला स्पष्ट करायचे आहे की मी काँग्रेस पक्ष सोडला नाही. मी प्रसारमाध्यमांना विनंती करतो की, माझ्या अन्य पक्षात जाण्याबाबत खोट्या बातम्या पसरवू नका. थोडी सभ्यता पाळूया आणि अनावश्यक गोंधळ निर्माण करणे टाळूया. तुम्ही समजून घेतल्याबद्दल सर्वांचे आभार”, अशी पोस्ट अस्लम शेख यांनी केली आहे.
अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर त्यांनी आमदारकीचाही (विधानसभा सदस्यत्वाचा) राजीनामा दिला आहे. तशी पत्रं त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिली आहेत. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर पटोले हे काँग्रेस हायकमांडशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला रवाना होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
हेही वाचा >> “अशोक चव्हाणसुद्धा काँग्रेसवर दावा करून…” संजय राऊतांची सूचक पोस्ट, म्हणाले…
आमदारकीचाही राजीनामा
अशोक चव्हाण यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब करणारं एक पत्र सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या पत्रात चव्हाण यांच्या नावापुढे माजी विधानसभा सदस्य असा उल्लेख आहे. याचाच अर्थ चव्हाण यांनी आधीच विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे, त्यापाठोपाठ त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला. नाना पटोले यांना लिहिलेल्या पत्रात अशोक चव्हाण यांनी लिहिलं आहे की, महोदय, मी दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ मध्यान्हापासून माझ्या इंडियन नॅशनल काँग्रेस (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस) पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा या पत्राद्वारे सादर करत आहे.
त्यापाठोपाठ अशोक चव्हाण यांनी स्वतः समाजमाध्यमांद्वारे सर्व घडामोडींची माहिती दिली. चव्हाण यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “आज सोमवार, १२ फेब्रुवारी २०२४ रोजी मी ८५-भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला आहे.” तसेच चव्हाण यांनी समाजमाध्यमांवरील त्यांच्याबाबतची माहिती अपडेट केली आहे. वेगवेगळ्या समाजमाध्यमांवर असलेल्या त्यांच्या प्रोफाईलवरील काँग्रेससंबंधीची सर्व माहिती हटवण्यात आली आहे.