भारताच्या संसदेबद्दल प्रचंड आदर असून देशद्रोहाचा आरोप मी कसा सहन करणार, असा उलट सवाल ज्येष्ठ पत्रकार डॉ. वेदप्रताप वैदिक यांनी केला. नागपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापात ते बोलत होते.
कुख्यात दहशतवाद्याची पाकिस्तानात जाऊन मुलाखत घेतल्याप्रकरणी डॉ. वैदिक यांच्यावर प्रचंड टीका होत असून संसदेत त्यांच्याविरुद्ध देशद्रोहाचा प्रस्ताव आणण्याची मागणी करण्यात आली होती. यासंबंधी विचारले असता संसदेबद्दल प्रचंड आदर असल्याचे वैदिक यांनी स्पष्ट केले. अजमेर येथे ‘सच बोलनेके खतरे’ या विषयावरील भाषणाचा वृत्त वाहिनींच्या वार्ताहरांनी विपर्यास केला. मुळात भाषणाचा वृत्तांत न दाखविता घाईघाईत वृत्त वाहिनीच्या वार्ताहराने धुळफेक करणारी बातमी प्रसारित केली. देशद्रोहाचा आरोप कुणी करीत असेल तसेच तसा प्रस्ताव संसदेत आणत असेल तर ते मी कसे सहन करणार, असा सवाल त्यांनी केला. १९७० ते १९७५ दरम्यान असाच देशद्रोहाचा प्रस्ताव आणू पाहणाऱ्या इंदिरा गांधी यांच्या सरकारला जावे लागले होते, याकडे वैदिक यांनी लक्ष वेधले.
पाकिस्तानात जात असल्याचे व कुणाची मुलाखत घेत असल्याचे सांगायला मी सरकारचा नोकर नाही. पत्रकाराने तथाकथित देशद्रोह्य़ाची मुलाखत घेणे, त्याचे मत ऐकून घेणे यात गैर काहीही नाही, असे ते म्हणाले. काश्मीर स्वतंत्र व्हावे, असे म्हटलेले नव्हते. ‘आपके कब्जेमे जो काश्मीर है उसको आझादी दो, काश्मीरमे दिल्ली या लाहोर जैसी आझादी देनी चाहिए’ असे म्हटले होते. वृत्त वाहिन्यांच्या वाहिन्यांना टीआरपी हवे असते म्हणून ते विपर्यास करतात, असा आरोप वैदिक यांनी केला.  ठोकमतांच्या लालसेपोटी कुणी विदर्भाकडून अपेक्षा करीत असेल तर त्यांना विदर्भातील कुणीही मतदान करणार नाही, असे वैदिक यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. विदर्भाच्या मागणीसाठी निवडणुकीवर बहिष्कार घालणे योग्य नसून मतदान करताना विदर्भासाठी मतदान करीत असल्याची चिठ्ठी पेटीत टाका. छत्तीसगड, तेलंगणा, झारखंड आदी राज्ये स्वतंत्र होऊ शकतात तर विदर्भ वेगळा का होऊ शकत नाही. नागपुरातील नितीन गडकरी केंद्रात मंत्री असतानाही विदर्भ राज्य होऊ शकत नाही, हा विदर्भावर हा अन्याय आहे, असे ते म्हणाले.

Story img Loader