भाजपाच्या खासदार पूनम महाजन यांनी शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे. २०१९ मध्ये दोन मित्रांनी एकत्र लढाई लढली, ती जिंकली मग असे काय घडलं की फूट पडली. तेव्हा मित्राने मित्राची गरज करायची होती. कारण, जनतेने शिवसेना-भाजपा-रिपाईच्या युतीला मते देत महाराष्ट्राच्या कल्याणाची अपेक्षा केली. पण, तुम्ही भाजपाची साथ सोडून जनमताचा अपमान केला, अशी टीका पूनम महाजन यांनी केली आहे.
भाजपाच्या वतीने ‘जागर मुंबई’ अभियानाची सुरुवात वांद्रे येथून झाली. तेव्हा पूनम महाजन बोलत होत्या. “या दोन मित्रांमध्ये महाभारत घडवणारे शकुनी कोण होते. युतीतलं महाभारत घडवून शकुनींनी सत्ता स्थापन केली. मला माहिती आहे, मी जेव्हा शकुनी म्हणेल, तेव्हा वेगवेगळ्या पक्षातले भरपूर जण माझ्यावर बोट करून विचारतील, तू कोण आहे बोलणारी? तुझ्या बापाला कोणी मारलं, याचं उत्तर दे. त्यांना सांगू इच्छिते, मला माहिती माझ्या बापाला कोणी मारलं, प्रत्येकवेळी तो प्रश्न उपस्थित करून फरक पडत नाही. पण, त्याच्या मागचा मास्टरमाइंड कोण होता, हे तुम्ही सत्तेत असताना कधी शोधले नाहीत,” असा सवाल पूनम महाजन यांनी उपस्थित केला आहे.
“आश्वासन नाही तर आता…”
“संरक्षण खात्याच्या, रेल्वेच्या, विमानतळाच्या, सरकारी वसाहतीमध्ये, फनल झोनमध्ये अडकलेल्या एसआर प्रकल्पामधील सर्व रहिवाशांना हक्काचे घर देण्यासाठी हा जागर होत आहे. हा जागर वाहतूक समस्या सोडवण्यासाठी, अद्ययावत रुग्णालय केंद्र उभारण्यासाठी होत असून, आश्वासन नाही तर आता निर्णय होणार,” असा निर्धार पूनम महाजन यांनी व्यक्त केला.