गोपीनाथ मुंडे यांचे अपुरे काम पूर्ण करण्यासाठी राज्यातील इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाने पंकजा मुंडे यांच्या मागे एकजुटीने उभे राहावे, अशी अपेक्षा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी शुक्रवारी व्यक्त केली. दसऱयानिमित्त बीडमधील भगवानगडावर जमलेल्या हजारो भक्तांशी अमित शहा यांनी संवाद साधला. गोपीनाथ मुंडे यांच्या अनुपस्थिती पहिल्यांदाच भगवानगडावर दसऱय़ाचा उत्सव साजरा होतो आहे. मुंडे यांच्या आकस्मिक निधनाबद्दल सर्वांनीच यावेळी दुःख व्यक्त केले.
आपण कोणतेही राजकीय भाषण करणार नाही, असे सांगतानाच अमित शहा यांनी तुमच्या मनात काय आहे. हे मला माहिती असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, भाजपच्या नेतृत्त्वाला तुमच्या मनात काय आहे, हे माहिती आहे. राज्यातील लाखो लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी वंजारी समाजासह इतर मागासवर्गीयांनी पंकजा मुंडे यांच्या मागे एकजुटीने उभे राहिले पाहिजे. दसरा हा अन्यायावर न्यायाच्या विजयाचे प्रतिक आहे. यावेळी न्यायाचा अन्यायावर विजय होणे निश्चित झाले आहे.
गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारमधील ज्या दोन खात्यांची महत्त्वाची भूमिका असते. त्या ग्रामविकास आणि पंचायतराज या दोन्ही खात्यांची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याकडे दिली होती. अत्यंत विचार करून मोदींनी हा निर्णय घेतला होता. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. त्यामुळे आज गोपीनाथ मुंडे आपल्यामध्ये नाहीत, याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले.
या कार्यक्रमाला भाजपचे नेते एकनाथ खडसे, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, शिवसंग्राम संघटनेचे विनायक मेटे आदी नेते उपस्थित होते.