शिवसेनेचे ( शिंदे गट ) हिंगोलीतील आमदार संतोष बांगर यांनी सोमवारी ( २८ ऑगस्ट ) कावड यात्रा काढली. यावेळी संतोष बांगर यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. कावड यात्रेत बांगर यांनी पोलिसांबाबत केलेलं विधान चर्चेत आलं आहे. मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो, तर पोलिसांना भगव्या टोप्या देईन, असं वक्तव्य बांगर यांनी केलं होतं. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संतोष बांगर काय म्हणाले?
“राज्यात आमची सत्ता आली, तर सर्वांना भगव्या टोप्या देईल, असं बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं होतं. त्यामुळे कदाचित मी मुख्यमंत्री झालो, तर सर्व पोलिसांना भगव्या टोप्या देईन,” असं संतोष बांगर यांनी म्हटलं.
हेही वाचा : “गद्दाराला नाग समजून पूजा केली, पण…”, उद्धव ठाकरेंचा संतोष बांगरांवर हल्लाबोल
“…तर वाईट काय?”
यावर बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “मला अतिशय आनंद होतोय की, माणसाने स्वप्ने पाहावीत. महत्वाकांक्षी असावं. आजची परिस्थिती पाहता, स्वप्न सत्यात उतरणे शक्य झालं आहे. त्यामुळे संतोष बांगर मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहत असतील, तर वाईट काय आहे?”
“संतोष बांगर माझ्या भावासारखे आहेत”
“बॉडी दाखवत तलवार बाहेर काढणारा मुख्यमंत्री मला आवडेल. दररोज गाडीवर बसून तलवार फिरवत जाईल. महाराष्ट्रातील बदललेल्या संस्कृतीत संतोष बांगर यांचं महत्वाचं स्थान आहे. संतोष बांगर माझ्या भावासारखे आहेत,” असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.