प्रहारचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांनी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. पंकजा मुंडे यांच्यात मोठी क्षमता आहे. त्यांच्याकडं ताकदही आहे. त्यांचे स्वत:चे दहा-पंधरा आमदार असतील, तर आम्ही त्यांच्याबरोबर युती करू, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. ते नाशिकमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
पंकजा मुंडे यांनी ‘शिवशक्ती परिक्रमा’ यात्रा काढली आहे. त्यासंदर्भात बच्चू कडू यांना प्रश्न विचारल्यावर पंकजा मुंडे यांच्याबरोबर युती करण्यास त्यांनी तयारी दर्शवली.
हेही वाचा : “…तर मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ देणार नाही”, विजय वडेट्टीवार यांची ठाम भूमिका
बच्चू कडू म्हणाले, “पंकजा मुंडे यांच्यामध्ये क्षमता आहे, यात मला शंका आहे. आमच्यात सुद्धा क्षमता आहे. आम्ही मेहनत करतो. आम्ही गावा गावात जातो, जिल्ह्यात जातो, माझ्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल आहेत. जेवढं लढायचं तेवढं लढतोय, जेवढं काम करायचं तेवढं करतोय.”
हेही वाचा : मोदी सरकार संविधानातून ‘इंडिया’ शब्द हटवण्याची चर्चा, शरद पवार म्हणाले, “सत्ताधाऱ्यांना…”
“आमच्यात क्षमता नसताना, आमचा बापदादा राजकारणात नसताना सुद्धा कामातून सेवेतून उभं केलेलं वलय आहे. आम्ही कुणाला जातीबद्दल सांगितलं नाही. सेवा हा आमचा पहिला धर्म आहे. सेवेशिवाय आम्हाला काही समजत नाही. पंकजा मुंडे यांच्यात क्षमता आहे. त्यांनी तपासली पाहिजे. स्वत:चे दहा-पंधरा आमदार असतील, तर हरकत नाही. आम्हीही त्यांच्याबरोबर युती करू,” असं बच्चू कडू यांनी सांगितलं.