Pune Shivshahi Bus Rape Case Update : पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास बलात्कार झाला. बलात्कारानंतर हा आरोपी जवळपास तीन दिवस पोलिसांना चकवा देत होता. अखेर सीसीटीव्ही फुटेज, श्वान पथक आणि ड्रोनच्या सहाय्याने पोलिसांनी आरोपीला गुणाट गावातून मध्यरात्री अटक केली. दरम्यान, त्याच्या अटकेचा थरार सुरू असताना त्याने झाल्या प्रकाराबाबत माफी मागितली असून स्वतःची चूकही कबूल केली. तसंच, माझ्या मुलाकडे लक्ष द्या, अशी विनंतही त्याने गावकऱ्यांना केली. याबाबत स्थानिक गावकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आम्ही त्याला आवाज दिला. आवाज दिल्यानंतर तो अंधारातून आला”, असं एका गावकऱ्याने सांगितलं. तर, दत्तात्रय गाडेला अटक करण्याआधी पोलिसांनी माझी चौकशी केली होती, दमदाटी करून दत्तात्रय गाडेविषयी विचारलं होतं, असंही या ग्रामस्थाने सांगितलं.

“दत्तात्रय गाडे दोन ते तीन दिवस पोलिसांना चकवा देत होता. अचानक गणेश गवाणे इथे बसलेले असताना त्याला आवाज आला. त्यामुळे आम्ही त्याला सर्वांनी मिळून धरलं. तो स्वतःहूनच समोर आला होता”, अशीही प्रतिक्रिया दुसऱ्या ग्रामस्थाने दिली.

“मला वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे मी दत्तात्रय गाडेला कॉल दिला. शिरूरच्या जाधवसाहेबांच्या आदेशानुसार पुन्हा त्याला कॉल दिला. त्यानंतर चार-पाच मिनिटांनी त्याला पकडला असल्याचं आम्हाला कळालं. त्यानुसार आम्ही इथे आलो. तोपर्यंत स्वारगेट पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं होतं”, असं येथील पोलीस पाटलांनी सांगितलं.

माझ्या मुलाला जपा

“त्याला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं. पण येथे असलेल्या गावकऱ्यांना तो म्हणाला की, माझ्या मुलाला जपा, माझ्या मुलाकडे लक्ष द्या, माझ्याकडून चूक झाली”, अशी कबुली दिल्याचंही पोलिस पाटलांनी सांगितलं.

पोलिसांनी व स्थानिकांनी गुणाट निर्वी रस्त्यांवरील उसाच्या शेतासह अन्य भागात आरोपी गाडेचा शोध घेतला. तीन ड्रोनही या परिसरात पोलिसांच्या शोध मोहिमेत होते. सहपोलीस आयुक्त रजतकुमार शर्मा यांच्या सह वरिष्ठ पोलीस अधिकारी निखील पिंगळे, पोलीस निरीक्षक संदेश केंजळे आदी घटनास्थळी ठाण मांडून होते.

आरोपीची पत्नी खेळाडू

आरोपी दत्तात्रेय गाडेची आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य असून पत्नी व आठ वर्षाचा मुलगा आहे. तर त्याचे आई वडील शेतात काम करतात. त्याला एक भाऊ आहे. गाडेच्या पत्नी या खेळाडू असून काही वर्षापूर्वी पोलीस भरतीसाठीही प्रयत्न करीत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गाडेवर चोरीच्या गुन्हा सह अन्य गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल आहे.