अजित पवारांनी दोन दिवसांपूर्वी राज्यातील जनतेला पत्र लिहिले होते. त्यांनी शरद पवारांविरोधात भूमिका का घेतली, याबाबत त्यांनी या पत्रातून स्पष्टीकरण दिलं होतं. या पत्राबाबत शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी अजित पवारांच्या या पत्रावरून खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्ष, शिवसेना यांच्यासोबत जाताना वेगळा विचार केला, त्या बाबत अनेक माध्यमातून विविध प्रकारे आजही चर्चा होत आहे. या बाबत माझी नेमकी भूमिका राज्यातील सन्माननीय नागरिकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने या बाबत केलेला हा पत्रप्रपंच”, असं अजित पवारांनी २५ फेब्रुवारीला लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं. यावेळी त्यांनी “विचारधारा, ध्येयधोरणे यांच्याशी कोणतीही तडजोड न करता विकासकामे वेगाने मार्गी लागावेत, याच उद्देशाने वेगळी भूमिका घेतली, यात कोणाचाही अवमान करणे, कोणाच्याही भावना दुखाविणे, कोणालाही दगा देणे किंवा पाठीत खंजीर खुपसणे असा कोणताही उद्देश अजिबात नव्हता व कधीच नसेल”, अशी भूमिका स्पष्ट केली होती.
हेही वाचा >> अजित पवारांनी वेगळा निर्णय का घेतला? जनतेला खुलं पत्र लिहित म्हणाले, “मला राजकारणात…”
“या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली जो विकास होतो आहे, तो मला महत्वाचा वाटला, कणखर नेतृत्व व योग्य निर्णयप्रक्रीया हे त्यांचे गुण मला भावले. माझी आणि त्यांची कार्यप्रणाली मिळतीजुळती आहे, कामावर आमचे जास्त प्रेम आहे, त्यांच्यासमवेत माझ्या भविष्यातील विकासाच्या ज्या योजना आहेत, त्या अधिक प्रभावीपणे प्रत्यक्षात उतरविणे शक्य होईल, असे मला वाटल्याने मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे”, असंही अजित पवारांनी पत्रातून स्पष्ट केलं होतं.
हेही वाचा >> अग्रलेख: दादांचे पत्र!
अजित पवारांच्या या पत्राची दिवसभर प्रचंड चर्चा होती. राष्ट्रवादीत बंड केल्याच्या आठ महिन्यांनंतर त्यांनी याबाबत पुन्हा जाहीर स्पष्टता केल्याने आता त्यांच्या डोक्यात काही वेगळा विचार आहे का, अशीही चर्चा रंगली होती. त्यामुळे पुण्यातील एका पत्रकार परिषदेत शरद पवारांना या पत्राबाबत विचारण्यात आले. त्यावेळी शरद पवारांनी अजित पवारांच्या या पत्रावरून खोचक टीका केली.
पत्रकारानं अजित पवारांच्या पत्राबाबत प्रश्न विचारला. त्यावर अर्ध्यातूनच शरद पवार म्हणाले की, “मला ते माहिती नाही, मी फक्त लोकसत्ताचा अग्रलेख वाचला.”
काय म्हटलंय अग्रलेखात?
कोणत्याही पत्राचे काही एक प्रयोजन असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांस लिहिलेले, तुरुंगातून पं जवाहरलाल नेहरू यांनी आपली कन्या इंदिरा हीस लिहिलेली अथवा पू साने गुरुजींनी संस्कारक्षम वयातील आपली पुतणी चि. सुधा हीस लिहिलेली पत्रे इत्यादी. सामान्यजनही ‘पत्रास कारण की..’ असे सुरुवातीलाच रिवाजाने लिहितात. तथापि अजितदादांच्या पत्राचे प्रयोजन काय हा प्रश्न ते वाचून पडतो. ते पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री झाले हे कारण म्हणावे तर तसेही नाही आणि पहिल्यांदाच काकांचा हात सोडून प्रतिपक्षाच्या कळपास जाऊन मिळाले हे कारण म्हणावे तर तेही नाही. त्यामुळे त्यांच्या या पत्रकष्टामागील कारणांचा शोध घेण्यात वाचकांस बरीच ऊर्जा जाळावी लागते. अग्रलेख पूर्ण वाचण्याकरता येथे क्लिक करा.