Chhagan Bhujbal vs Manikrao Kokate : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर हिवाळी अधिवशनाच्या सुरुवातीला मंत्रिमंडळ विस्तार झाला. यामध्ये राष्ट्रवादीने (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना डावलले. यानंतर भुजबळांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने छगन भुजबळ यांनी पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर टीका केली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान राष्ट्रवादीने यावेळी नाशिक जिल्ह्यातून भुजबळ यांच्याऐवजी माणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. काल मंत्रिमंडळाचे खाते वाटप झाल्यानंतर कोकाटे यांना कृषी खाते मिळाले आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कोकाट प्रथमच मतदारसंघात आले होते. त्यावेळी छगन भुजबळ यांच्या नाराजी विषयी बोलताना, “मला वाटते भुजबळांनी पंतप्रधान व्हावे देशाचे”, असे विधान केले आहे.

काय म्हणाले माणिकराव कोकाटे?

मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर माणिकराव कोकाटे प्रथमच आपल्या सिन्नर मतदारसंघात आले होते. यावेळी पत्रकांनी त्यांना मंत्रिपद आणि छगन भुजबळ यांच्या नाराजीविषयी विचारले. छनग भुजबळ यांना अजित पवार यांनी राज्यसभेचा शब्द दिला होता, तो पूर्ण केला नाही असे भुजबळ बोलले असल्याचे पत्रकार म्हणाले. यावर उत्तर देताना कोकाटे म्हणाले, “शब्द पूर्ण होईल ना. सरकार स्थापन होऊत आतातरी ४ दिवस झाले आहेत. राज्यसभा कुठे पळून चालली आहे. दम तर काढला पाहिजे ना.”

मला वाटते भुजबळांनी पंतप्रधान व्हावे…

यावेळी पत्रकारांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना विचारले की, तुम्हाला वाटते का भुजबळांनी राज्यसभेत जावे? यावर कोकाटे म्हणाले, “त्यांना जे काही पाहिजे ते त्यांनी मागावे. मला काय वाटते याला काही अर्थ नाही. मला वाटते भुजबळांनी देशाचे पंतप्रधान व्हावे. मला काय वाटते ते देशामध्ये, जगामध्ये होईलच असे नाही.”

हे ही वाचा : “तीनशे भारतीयांचे व्हॉट्सॲप क्रमांक….”, पेगाससवर अमेरिकन न्यायालयाच्या निकाल; काँग्रेसने डागली तोफ

महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांच्या पक्षाला १० मंत्रिपदे मिळाली आहे. यामध्ये राष्ट्रवादीने छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील आणि धर्मराव बाबा आत्राम यासारख्या ज्येष्ठ नेत्यांना मंत्रिमंडळात संधी दिली नाही. यावेळी त्यांनी हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, दत्ता मामा भरणे, नरहरी झिरवळ, माणिकराव कोकाटे, बाबासाहेब पाटील, मकरंद पाटील, आणि इंद्रनिल नाईक यांना मंत्रिपद दिले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I think bhujbal should become the prime minister ncps new minister manikrao kokate aam