राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वात मोठी फूट पडल्यानंतर आज शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन्ही गटांच्या स्वतंत्र बैठका पार पडल्या. बैठक झाल्यानंतर अजित पवार यांनी आक्रमक भाषण केलं आणि शरद पवार हे निवृत्त का होत नाहीत? निवृत्तीचं एक वय असतं असं म्हणत थेट शरद पवारांनाच आव्हान दिलं आहे. अशात सुप्रिया सुळेंशी झालेली चर्चाही अजित पवारांनी सांगितली. तसंच सुप्रिया सुळे काय म्हणाल्या ते उत्तरही त्यांनी दिलं. निवृत्तीचं एक वय असतं याची जाणीवही त्यांनी करुन दिली आहे.

मी सुप्रियाला विचारलं हा नेमका कुठला हट्ट?

“मी सुप्रियाशीही बोललो, सुप्रिया आपण एका घरातले, एका कुटुंबातले आहोत त्यांना काहीतरी सांग. त्यावर सुप्रिया म्हणाली ते हट्टी आहेत. हा नेमका कसला हट्ट आहे? शरद पवारांविषयी आम्हाला खूप आदर आहे. आत्ता सांगितलं की काही काही आमदारांना बोलवलं जातं. ते भेटले नाही तर त्यांच्या पत्नींना फोन केला जातो भावनिक केलं जातं. मी नाव घेत नाही वरिष्ठ नेत्याने एका आमदाराला सांगितलं की का तिकडे जातो. त्याने हात जोडून सांगितलं आम्ही दादांना शब्द दिला आहे. भावनिकदृष्ट्या काही झालं नाही की म्हणायचं तू निवडून कसा येतो तेच मी बघतो. हे वडिलांच्या स्थानी असलेल्या माणसाने ऐकवायचं?” असा प्रश्नही अजित पवार यांनी विचारला आहे.

आमदार मला सांगत होते दादा तुम्ही..

“अनेकदा हे सगळे आमदार म्हणायचे काहीतरी करा, २०१९ चं आम्हाला माहित नव्हतं. तुम्ही आता काही पावलं उचलली तर आम्ही तुम्हाला साथ देऊ. त्यामुळे तुमच्या सगळ्यांवर विश्वास ठेवूनच आम्ही हे पाऊल उचललं आहे. आज नरेंद्र मोदींचा करीश्मा देशात आहे. २०१४ च्या निवडणुकीत एकट्या नरेंद्र मोदींकडे पाहून कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत भाजपा सत्तेवर आला आहे. २०१९ ला पुन्हा त्यांना निर्विवाद बहुमत मिळालं” असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

आज राष्ट्रवादी काँग्रेसवर ही वेळ का आली?

आज राष्ट्रवादीवर आणि आपल्यावर ही वेळ का आली? मी देखील साहेबांच्याच छत्रछायेखाली मी तयार झालो आहे. १९७८ ला आपल्या वरिष्ठ नेत्यांनी वसंतदादा पाटील यांचं सरकार स्थापन करुन पुलोदचं सरकार आणलं. त्यावेळी शरद पवार हे ३८ वर्षांचे होते. तेव्हापासून साहेबांचं राजकारण महाराष्ट्र बघत होते. पुलोदच्या सरकारमध्ये जनसंघही होता, जो आत्ताचा भाजपा आहे. तसंच आत्ता देशाला करीश्मा असणाऱ्या नेत्याची देशाला गरज आहे आणि ते नेते म्हणजे नरेंद्र मोदी आहेत असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे.

Story img Loader