Ajit Pawar Statement on Want to Become CM : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. तसंच, नवं सरकार स्थापन झाल्यानतंर मुख्यमंत्री कोण होणार? महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाचा फॉर्म्युला कसा असणार? यावर चर्चा सुरू आहेत. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे. इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्हमध्ये ते बोलत होते.

अजित पवार हे सर्वाधिक काळ उपमुख्यमंत्री राहिलेले आमदार आहेत. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पदाची आस आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, “मला मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे. पण मी उपमुख्यमंत्रीपदाच्या पलीकडे जाऊ शकत नाही”, अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. याबाबत ते म्हणाले, “मला मुख्यमंत्री बनायचं आहे. पण माझी गाडी उपमुख्यमंत्री पदावरच अडकली आहे. गाडी पुढे जावी याचा मी प्रयत्नही करतोय. पण संधीच मिळत नाही.”

ते पुढे असंही म्हणाले की, “२००४ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्री पद आलं होतं. परंतु, त्यावेळी पक्ष नेतृत्त्वाने या पदावरचा दावा सोडला आणि काँग्रेसला संधी दिली.”

हेही वाचा >> Ajit Pawar : अजित पवार महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार? राष्ट्रवादीला किती जागा मिळणार? उपमुख्यमंत्र्यांकडून सर्व प्रश्नांची उत्तरं

“जो कोणी खुर्चीवर बसतो त्याला ही खुर्ची आवडते. तुम्हालाही तुमची खुर्ची आवडत असेल ना. त्यामुळे प्रत्येकाने प्रयत्न करावेत. महाराष्ट्र मुख्यमंत्री पदाची एकच जागा आहे आणि १४५ मॅजिक फिगर आहे. जो १४५ मॅजिक फिगर गाठेल तो मुख्यमंत्री बनेल”, असंही अजित पवार म्हणाले.

जागा वाटपाचा फॉर्म्युल ठरला

आगामी विधानसभा निडवडणूक महायुतीमधून लढवणार असून २०१९ मध्ये प्रत्येक पक्षाने जिंकलेल्या जागांनुसार जागावाटप केले जाईल असं अजित पवार म्हणाले. “२०१९ मध्ये जिंकलेल्या जागांवर भाजपा जागा लढवणार आहे. तसंच, राष्ट्रवादी आणि शिवसेनेसाठीही हेच सूत्र आहे. त्यामुळे २०० जागांवर जागावाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट आहे. उर्वरित ८८ जागा मित्रपक्षांमध्ये विभागल्या जातील”, असं अजित पवार म्हणाले.

शरद पवारांच्या डोळ्यांत डोळे घालून नाही पाहू शकत

तुमच्या समोर शेवटच्या रांगेत शरद पवार बसले आहेत, असं समजा. त्यांना तुम्ही काय सांगाल? असा प्रश्नही अजित पवारांना आज विचारण्यात आला. त्यावर अजित पवार म्हणाले, “ते माझे मोठे काका आहेत. मी त्यांना काय बोलणार? मी त्यांच्या डोळ्यांत डोळे घालूनही पाहू शकत नाही. मी मान खाली घालेन.”