औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, तर उस्मानाबादचे धारशिव असं नामांतर करण्यास कोणतीही हरकत नाही, असं पत्र केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाने शुक्रवारी राज्य सरकारला पाठवलं. यानंतर दोन्ही शहरांच्या नामांतराचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्राच्या मान्यतेनंतर राज्य सरकारने शहरांनी नावे बदलण्याची अधिसूचना जारी केल्यापासून ही दोन्ही शहरे नव्या नावाने ओळखली जाणार आहेत. मात्र, या नामांतराला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध दर्शवला आहे.
एमआयएमच्या राष्ट्रीय मेळाव्यात बोलताना इम्तियाज जलील म्हणाले की, “इम्तियाज जलील हे औरंगाबादचे खासदार होते आणि औरंगाबादचेच खासदार राहतील. काहीजण औरंगाबादचे नामांतर केल्यानंतर उड्या मारत आहेत. पण, माझा जन्म औरंगाबादमध्ये झाला आणि मी औरंगाबादमध्येच मरणार,” असं इम्तियाज जलील यांनी सांगितलं.
हेही वाचा : “एकनाथ शिंदेंसारखा मराठा चेहरा शिवसेनेतून बाहेर जात होता, म्हणून…”, गुलाबराव पाटलांचं गद्दारीबाबत विधान
“नाव बदलून औरंगाबादचा विकास होणार आहे का?”
तर, एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही नामांतरला विरोध कायम राहणार असल्याचं सांगितलं. “स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात न घेताच परस्पर हे नामांतर करण्यात आलं आहे. नाव बदलून औरंगाबादचा विकास होणार आहे का? किंवा शहरातील नागरिकांना दोन वेळ पुरेसे पाणी मिळणार आहे का,” असा सवालही ओवैसी यांनी उपस्थित केला आहे.