Bhaskar Jadhav on Shivsena : कोकणातील माजी आमदार राजन साळवी यांनी काहीच दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशाआधी त्यांच्या नाराजीच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या. मात्र, त्यांनी पक्ष सोडून जाऊ नये याकरता शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने बरेच प्रयत्न केले. राजन साळवींच्या निमित्ताने कोकणातील एक भाग शिंदेंच्या गोटात गेलेला असताना आता कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधवही नाराज असल्याच्या चर्चा आहेत. यासंदर्भात भास्कर जाधव यांनीच उघड नाराजी व्यक्त केली आहे. ते टीव्ही ९ मराठीने घेतलेल्या मुलाखतीत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भास्कर जाधव म्हणाले, “माझी राजकारणातील सुरुवात होती तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर मला भाषणं करायीच संधी मिळाली. त्यावेळच्या शिबिरांत मला भाषणं करण्याची संधी मिळायची. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींना बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की या पोराला महाराष्ट्रात फिरवा, याला महाराष्ट्रात फिरवला तर ग्रामीण भागातील, तळागाळातील माणूस आपल्याला जोडला जाईल. शिवसेना प्रमुखांचे हे आशीर्वाद लाभले. त्यानंतर पवारांचे आशीर्वाद लाभले.”

“महाराष्ट्रात मला मानणारा वर्ग आहे. महाराष्ट्रात मी लोकांशी बोलतो, संवाद साधतो. यात नाटकीपणा नसतो, लबाडी नसते, खोटं बोललेलं मला आवडत नाही. महाराष्ट्रातील लोकांना हे भावतं. पण माझं दुर्दैवं मला सतत आडवं आलं आहे. मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही”, अशी खंत भास्कर जाधव यांनी बोलून दाखवली.

संजय राऊत काय म्हणाले?

“भास्कर जाधवांशी काल चर्चा झाली. शिवसेने सर्व नेते आज आम्ही एकत्र भेटणार आहोत. कोणाची खंत असेल तर त्यावर आम्ही चर्चा करू”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

“भास्कर जाधव आमचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्याबद्दल सर्वांना आदर आहे. दुर्दैवाने शिंदें गटाकडून बेसुमार पैशांचा वापर करून आमदार फुटतील, खासदार फुटतील, पदाधिकारी फुटतील या अफवा पसरवल्या जात आहेत. त्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही”, असं स्पष्टीकरण माजी खासदार विनायक राऊत यांनी दिलं.