गुजराती आणि बंगालीमध्ये रंगभूमी ही चळवळ आहे, तर मराठीमध्ये रंगभूमी हा धर्म आहे. श्वास आणि जेवणाप्रमाणे नाटक ही मराठी माणसांची गरज आहे. मराठी रंगभूमीवरील नाटके आणि परिश्रम घेणारे कलाकार यामुळे ही रंगभूमी समृद्ध आहे. मराठी रंगभूमी आणि कलाकारांना माझा मानाचा मुजरा, अशी भावना प्रसिद्ध अभिनेते परेश रावल यांनी सोमवारी व्यक्त केली आणि ‘मी मराठीमध्ये असतो तर आता आहे त्यापेक्षाही अधिक चांगला अभिनेता झालो असतो,’ असेही ते म्हणाले.
आशय सांस्कृतिकतर्फे आयोजित पुलोत्सवामध्ये ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या हस्ते परेश रावल यांना पुल स्मृती सन्मान प्रदान करण्यात आला. त्यापूर्वी परेश रावल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. परेश रावल म्हणाले, मी नशीबवान असल्यामुळे चांगल्या भूमिका माझ्या वाटय़ाला आल्या. एकदा खलनायकाची भूमिका केल्यावर कलाकार त्याच साच्यामध्ये अडकण्याची शक्यता असते. मी खलनायक नाही किंवा विनोदी कलाकारही नाही. तर मी चरित्र अभिनेता आहे. काही भूमिका चांगल्या मिळतात, तर काही भूमिकांमध्ये कलाकाराने आपल्या अभिनयाने रंग भरायचा असतो. शेवटी चांगले पैसे मिळणे महत्त्वाचे आहे. मी अशा क्षेत्रात काम करतो की जिथे लोक बुद्धीने नाही तर नशिबावरच काम करतात. मात्र, केतन मेहता यांचा ‘सरदार’ आणि महेश भट्ट यांचा ‘तमन्ना’ असे चांगले चित्रपट जणू माझीच वाट पाहात होते.
‘काटकोन त्रिकोण’चे गुजराती रूपांतर असलेल्या ‘डिअर फादर’ या नाटकाद्वारे मी १६ वर्षांनी पुन्हा रंगभूमीवर काम करण्याचा आनंद लुटत आहे. आता मी अशा वयाचा झालो आहे की मला ती भूमिका समजू शकली. विवेक बेळे यांची संहिता वाचल्यानंतर मी संवाद नाही तर माझे आयुष्यच वाचतो आहे. मृण्मयी गोडबोले किंवा गिरिजा ओक या मराठी कलाकारांसमवेत काम करीत आहे. गुजराती रंगभूमीमध्ये आघाडीवर असलेल्या सविता जोशी आणि पद्माराणी या कलाकार मूळ मराठीच आहेत. कलाकार म्हणून माझ्या जडणघडणीमध्ये रंगभूमीचे शंभर टक्के योगदान आहे. नाटकांचे दौरे ही माझ्यासाठी आनंदाची पर्वणी असते. अभिनेता म्हणून पारखून घेण्यासाठी रंगभूमीवर काम करणे ही माझी गरज आहे.
चित्रपटांतून राजकीय व्यक्तिरेखा साकारणारे परेश रावल प्रत्यक्षात राजकारणात जाणार का, असे विचारले असता ते म्हणाले, राजकारणाची आवड आहे. चांगले लोक राजकारणात जाणार नसतील तर मग राजकारण्यांविषयी बोलण्याचा आपल्याला अधिकार राहात नाही. आम्ही मतदान करीत नाही आणि राजकारणाच्या मैदानातही उतरत नाही. सध्या उघडकीस येणारी भ्रष्टाचाराची प्रकरणे पाहता नक्षलवादी व्हावे असे वाटते. देशात अजून क्रांती का होत नाही याचेच आश्चर्य वाटते.
मराठीत असतो तर अधिक चांगला अभिनेता झालो असतो- परेश रावल
गुजराती आणि बंगालीमध्ये रंगभूमी ही चळवळ आहे, तर मराठीमध्ये रंगभूमी हा धर्म आहे. श्वास आणि जेवणाप्रमाणे नाटक ही मराठी माणसांची गरज आहे. मराठी रंगभूमीवरील नाटके आणि परिश्रम घेणारे कलाकार यामुळे ही रंगभूमी समृद्ध आहे.
आणखी वाचा
First published on: 06-11-2012 at 01:13 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I will be good acter in marathi film industry