महाराष्ट्रात कुठेही घटनाबाह्य मुख्यमंत्री आले की काय दिसतं? खुर्च्यांची गर्दी बाकी काही नाही दिसतच नाही. २०१९ ला जन आशीर्वाद यात्रेत याच तारखांना मी नाशिकमध्येच होतो. सध्या पाऊस कमी पडला आहे. मी पाऊस बरोबर घेऊन आलो आहे. सध्या राज्यात महाराष्ट्राची जी राजकीय स्थिती झाली आहे ती तुम्ही पाहिलीच असेल. राजकारणाचा चिखल झाला आहे असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. येवला या ठिकाणी ठाकरे गटाचा मेळावा पार पडला त्यावेळी आदित्य ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे. एवढंच नाही तर आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उल्लेख अलीबाबा असा केला आहे.
काय काय म्हणाले आदित्य ठाकरे?
“४० गद्दार गेल्यानंतरही मला हे माहित होतं की जनता आपल्याला सोडणार नाही. जनता उद्धव ठाकरेंबरोबरच आहे याची मला खात्री आहे. या महाराष्ट्राला आपल्याला चांगले दिवस दाखवयाचे आहेत. महाराष्ट्रातलं राजकारण हे सध्या साफ आणि स्वच्छ विरुद्ध स्वार्थी आणि गलिच्छ असं झालेलं आहे. जे माझ्यासह आहेत त्यांच्यासह पुढे जायला तयार आहे.” असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
हे ही वाचा- “इर्शाळवाडी दुर्घटना, ते धारावी…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितला पंतप्रधानांसह झालेल्या चर्चेचा तपशील
महाराष्ट्राला लुटणाऱ्या मुख्यमंत्र्यांना मी अलीबाबाच म्हणणार
मुख्यमंत्री जे घटनाबाह्य आहेत, गद्दार आहेत अलीबाबा आहेत. होय मी त्यांना अलीबाबाही म्हणतोच आहे कारण ते महाराष्ट्राला लुटत आहेत. दर दोन दिवसांनी कुठे जातात ते दिल्लीला. आज काय बदल होतो आहे म्हणून बोलवलं आहे का? असा खोचक प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्री दर आठवड्यात दोनदा दिल्लीला जाणार असतील तर महाराष्ट्राच्या गल्ल्यांमध्ये कोण फिरणार? ठाणे, मुंबई, नाशिकची परिस्थिती बघा. कुणीही खुश नाही, एका वर्षात एक तरी उद्योग किंवा रोजगाराची संधी आली आहे का? येवल्यात मी आलोय तुम्हीच मला सांगा नोकरीच्या संधी किंवा उद्योगाच्या संधी किती आल्या? एक वर्षात आम्ही पाहिलं आहे ग्रामीण भाग किंवा शहरी भाग इथून आवाज येतो आहे की आमचं सरकार नेमकं आहे तरी कुठे? सरकारविरोधी लढा हा आपल्याला एकत्रितपणे द्यावा लागणार आहे असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रातल्या राजकारणाची स्थिती काय आहे? जो महाराष्ट्र महाविकास आघाडीच्या काळात पुढे नेत होतो, जो महाराष्ट्र उद्धव ठाकरे पुढे नेत होते. आज तो महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय? असाच प्रश्न पडतो. हिंदीत राजकीय पक्षांना काय म्हणतात? राजनितीक दल.. बरोबर ना? आता दल झाली आहे की दलदल झाली आहे? हेच कळत नाही. चिखल, दलदल असंच सध्याच्या राजकारणाचं स्वरुप झालं आहे.
हे पण वाचा- उपमुख्यमंत्रीपद वाचलं, पण २०२४ मध्ये…देवेंद्र फडणवीस यांच्या कुंडलीवरून ज्योतिषतज्ज्ञांची सविस्तर माहिती
आता होर्डिंग पाहिलं की कोण कोणाचा फोटो लावतं आहे? नाव कुणाचं आणि आशीर्वाद कुणाचा हे बघावं लागतं आहे. जनतेच्या मनातही हाच संभ्रम आहे की आम्ही ज्यांना निवडून दिलं आम्ही ज्यांना मत दिलं ते आता टुपुक टुपुक सरकारमध्ये कसे जाऊन बसतात? आत्ता आपण डेमोक्रसी हॉलमध्ये बोलतो आहोत, देशात डेमोक्रसी राहिली आहे का? असा सवालही आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.
सध्याचं वातावरण जे आहे ते बघवत नाही. आम्ही भोळे आहोत. मी आणि उद्धव ठाकरेंना राजकारण जमत नसेल. आम्ही राजकारण्यांसारखे वागत नाही. आम्ही तुमच्यासारखेच साधे आहोत. आम्हाला फोडाफोडीचं राजकारण येत नाही. आम्ही जनतेचा आवाज ऐकत राहिलो, फोडाफोडीकडे लक्षही दिलं नाही ही आमची चूक आहे का? असाही प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला आहे. सध्या महाराष्ट्राला तोडण्याचं आणि दिल्लीसमोर झुकवण्याचं राजकारण सुरु आहे.