माझ्या वाढलेल्या ताकदीमुळे राजकीय चिखलफेक करण्याचे काम सुरू आहे. जनता हेच माझे दैवत असल्याने त्याच्या ताकदीच्या आधारे लोकसभा निवडणूक लढविणार आहे, असे मत भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष धनंजय महाडिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. खासदार मंडलिक यांनी माझ्या संदर्भात केलेल्या विधानामागे कोणीतरी ‘सूर्याजी पिसाळ’ असून त्याचा योग्यवेळी शोध घेतला जाईल,अशी टिप्पणीही त्यांनी केली.
धनंजय महाडिक गुंडाचे म्होरके आहेत, ग्रामपंचायतीत निवडून न येणारे ते जिल्ह्य़ाला उपरे आहेत, अशी टीका खासदार मंडलिक यांनी केली होती. ती धनंजय महाडिक यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. याबाबतची भूमिका त्यांनी आज स्पष्ट केली. ते म्हणाले, माझा जन्म, शिक्षण, उद्योग व्यापाराची कारकीर्द हे सर्वच कोल्हापुरात घडले असतांना मी उपरा कसा ठरतो? वारंवार गुंडांचे म्होरके अशी टीका करणाऱ्यांनी आमचे अवैध धंदे नेमके काय आहेत याचे पुरावे तरी जाहीर करावेत. गत लोकसभा निवडणुकीत मंडलिकांना एकाकी पाडून राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न जिल्ह्य़ातील नेत्यांनी चालविला असतांना त्यांना महाडिकांनी केलेली मदतच उपयोगी ठरली. युवाशक्तीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहताना मंडलिकांनी आमच्या कार्याचा गौरव केला होता. असे असताना एका रात्रीत गुंडांचा म्होरक्या म्हणून संभावना कशी केली याचे आश्चर्य वाटते.लोकसभा निवडणुकीतील महाडिकांनी केलेली हीच परतफेड आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
दोनवेळच्या निवडणुकीत पराभूत झालो तरी जनतेचा प्रतिसाद मिळाला. मंडलिकांविरूध्द लोकसभेला ३ लाख ८७ , तर विधानसभेला अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या राज्यात सर्वाधिक ८१ हजार ४०० मते मिळाली. भीमा सहकारी साखर कारखान्यात व १२ ग्रामपंचायतीमध्ये माझे वर्चस्व असतांना ग्रामपंचायतीतही निवडून न येणारा उमेदवार अशी टीका करणे अप्रस्तुत असल्याचा उल्लेख करीत महाडिक यांनी जनतेचे पाठबळ आपल्या बाजूने असल्याने लोकसभा निवडणूक ताकदीने लढविण्याचा निर्धार व्यक्त केला.
लोकशाहीचा स्वीकार केला असेल तर प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा हक्क आहे, असा उल्लेख करून महाडिक म्हणाले,की मंडलिक पाचव्यांदा लोकसभेची उमेदवारी लढविणार असतील तर त्याला, तसेच त्यांच्या सुपुत्राच्या उमेदवारीस माझा विरोध नाही. मात्र मला उमेदवारी देऊ नये, अशी चिखलफेक करून माझी राजकीय कारकीर्द संपविण्याचा खालच्या पातळीवर प्रयत्न सुरू आहे. आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडे जिल्ह्य़ाची सत्तासूत्रे असतांना त्यांनी सामान्य माणसाला मोठे करण्याचे काम केले. त्यांचे पुत्र अमल यास जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देण्याची वेळ आल्यावर मात्र सर्वानीच त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मनात आणले असते तर आमदार महाडिक यांनी तोडफोड करून मुलाला अध्यक्षपदी बसविले असते. पण पुतण्याची निवडणूक डोळ्यासमोर असल्याने ते थांबले आहेत, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला.
मागील निवडणुकीत मंडलिकांना सहकार्य
लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर गुलालात न्हालेले खासदार मंडलिक माझ्या घरी आले होते. तेंव्हा त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शरद पवारांसह इतरांना जे दाखवायचे होते ते दाखवून दिले आहे. त्यासाठी धनंजय व अरूंधती या उभयतांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे, असा उल्लेख करून, तुम्ही म्हणत असाल तर आजच खासदारकीचा राजीनामा देतो असे विधान केले होते, असे धनंजय महाडिक यांनी महालक्ष्मीची शपथ घेऊन सांगितले.
लोकसभा निवडणूक लढविणार – धनंजय महाडिक
माझ्या वाढलेल्या ताकदीमुळे राजकीय चिखलफेक करण्याचे काम सुरू आहे. जनता हेच माझे दैवत असल्याने त्याच्या ताकदीच्या आधारे लोकसभा निवडणूक लढविणार आहे, असे मत भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष धनंजय महाडिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 23-10-2013 at 12:12 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I will fight parliament election dhananjay mahadik