सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार मीच आहे. पक्षाने जर रामराजेंना उमेदवारी दिली तर मी अपक्ष म्हणून उभा राहणार असल्याचे सांगत, खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभेची उमेदवारी मिळो न मिळो, पण निवडणूक लढण्याचा निर्धार व्यक्त केला.
कराड मुक्कामी असलेल्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची उदयनराजेंनी भेट घेऊन कमराबंद चर्चा केली, मात्र त्याचा तपशील समजू शकला नाही. या बंद खोलीतील चर्चेबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, उदयनराजेंचे कराडच्या विश्रामगृहात आगमन होताच, मुख्यमंत्र्यांच्या शेजारील दालनामध्ये असलेल्या वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी हसतमुखाने या महाराज, असे नेहमीच्या स्टाईलमध्ये स्वागत करत सातारा लोकसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसने काय निर्णय घेतला असा प्रश्न केला. यावर उदयनराजेंनीही मिस्कीलपणे सातारसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार मीच असल्याचे ठासून सांगितले. रामराजेंच्या उमेदवारीची चर्चा सुरू आहे, त्याबाबत काय? असे डॉ. पतंगराव यांनी प्रतिप्रश्न करताच त्यांना पक्षाने उमेदवारी दिल्यास मी अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असल्याचे छातीठोक सांगत पक्षाने उमेदवारी देवो अगर न देवो लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असल्याचे रणशिंग फुंकत उदयनराजेंनी आपली पुढील दिशा अधोरेखित केली. त्यानंतरही गप्प न बसता तुम्ही कोठूनही उभे राहिलात तरी शिवेंद्रराजे तुमचाच प्रचार करतील असा चिमटा पतंगरावांनी काढला. यावर उदयनराजे यांनी जिल्ह्यात फक्त शिवेंद्रराजेंचाच मतदारसंघ सर्वात सुरक्षित असल्याचे सांगत पतंगरावांची खिल्ली उडवली. त्यानंतर उदयनराजे यांनी नेहमीप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मोर्चा वळवला. अजित पवारांचे मला कौतुक करावेसे वाटते. सहकाराला बदनाम करणा-यांना खडय़ासारखे बाजूला करा, असे म्हणणा-यांनीच सहकार क्षेत्र बदनाम केले. साहेबांचा हात पाठीवर आहे तोपर्यंतच यांचे राजकारण चालणार आहे. नंतर मात्र काही खरे नाही असे मत उदयनराजेंनी व्यक्त केले.

Story img Loader