महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे आता भाजपात जाणार आहेत. महिन्याभरापूर्वीच त्यांनी याबाबत माहिती दिली होती. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमामुळे त्यांचा भाजपा प्रवेश रखडला आहे. तसंच, ते यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचंही त्यांनी आज स्पष्ट केलं. ते एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उत्तर महाराष्ट्रातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून २०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक हरलेल्या रोहिणी खडसे २०२० मध्ये एकनाथ खडसे यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आल्या. एकनाथ खडसे यांनी ४० वर्षांचे भाजपाबरोबरचे ऋणानुबंध तोडून शरद पवारांना साथ दिली. शरद पवारांच्या साथीने एकनाथ खडसे पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय झाले होते. परंतु, राष्ट्रवादीत भवितव्य दिसत नसल्याचं कारण दे त्यांनी पुन्हा भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या काही काळात त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश होईल. परंतु, त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीत गेलेल्या त्यांच्या कन्या रोहिणी खडसे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार आहेत.

हेही वाचा >> मोदींनी शरद पवारांना दिलेल्या ऑफरनंतर एकनाथ खडसेंचं मोठं विधान; म्हणाले, “भविष्यात…”

याबाबत एकनाथ खडसे म्हणाले, मी ज्यावेळी भाजपात जायचं ठरवलं तेव्हा मी रोहिणीताईंनाही सांगितलं की माझ्याबरोबर भाजपात चला. परंतु, रोहिणीताईंनी सांगितलं की मी शरद पवारांबरोबरच राहु इच्छिते. गेले काही वर्षे मी येथे काम करते आहे. मला इथे मान सन्मान दिला आहे. आणि मला त्यांचे तत्व आवडतात. त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहीन. मला पुढच्याही निवडणुका लढवायच्या आहेत. आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भवितव्य आहे, असं तिला वाटतंय. म्हणून तिने भाजपात माझ्याबरोबर येण्यास नकार दिला.

आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपाकडून मुक्ताईनगरसाठी एकनाथ खडसेंना संधी मिळण्याची शक्यता आहे. तर, शरद पवारही रोहिणी खडसेंना संधी देतील, अशी चर्चा आहे. त्यामुळे बाप-लेकीत हा सामना रंगू शकतो. याबाबत एकनाथ खडसे म्हणाले, “रोहिणीताई राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळे त्या प्रामाणिकपणे राष्ट्रवादीच्या प्रचाराचं काम करत आहेत. त्यामुळे नंतरच्या कालखंडात मी भाजपात प्रवेश केला तर भाजपाचंच काम करणार. यापुढे निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नाही. मी सध्या विधान परिषदेचा आमदार आहे. शरद पवारांनी मला सांगितलंय की मी दिलेली वस्तू परत घेत नाही. शरद पवारांनीच मला अभय दिलं असल्याने मला दुसरा कोणी राजीनामा मागितला तरी फरक पडत नाही.”

पण राजकीय निवृत्ती घेतलेली नाही

“मी राजकारणातून निवृत्ती घेतलेली नाही. मी राजकीय माणूस आहे. पण आता निवडणूक लढवण्याकडे माझा कल नाही”, असंही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: I will not contest any more eknath khadses big announcement sgk
Show comments