शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मला उमेदवारी मिळाली नसली तरी मी नाराज नाही. शिवसेना हा पक्ष जात-पात मानत नाही. गरिबांचा, फाटक्या-तुटक्या माणसांचा हा पक्ष आहे. शोषणाच्या विरोधात तो संघर्ष करतो. त्यामुळे मी शिवसेनेतच राहणार असून प्रचारही करणार आहे, असे साहित्यिक व कार्यकर्ते लहू कानडे यांनी सांगितले.
कानडे यांना सेनेने उमेदवारी नाकारल्यानंतर आप, मनसे व तिसऱ्या आघाडीने त्यांच्याकडे उमेदवारीसंदर्भात विचारणा केली होती. पण त्यांनी त्यास नकार दिला. सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी त्यांना मुंबईत बोलावून चर्चा केली. त्यानंतर आज कानडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
कानडे म्हणाले, मी सेवानिवृत्त झाल्यानंतर राजकारणात सक्रिय झालो. सामाजिक कामाला राजकीय पक्षाच्या पाठिंब्याशिवाय निवडणुका करता येत नाही. त्यासाठी शिवसेना या लढाऊ संघटनेचा पर्याय निवडला. पक्षप्रमुख ठाकरे यांनी माझ्या भावना समजून घेतल्या. त्यांचे नेतृत्व सुसंस्कृत व कणखर आहे. मी सेनेत राहणार असून पक्षाचेच काम करीत राहीन. पक्षाने तिकीट दिले तरच निवडणूक लढविणार असे जाहीर केले होते. निवडणुकीत काहीतरी उचापती करणे माझे उद्दिष्ट नाही. पक्षाच्या मदतीने कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहीन. शिवसैनिकांनी प्रेम दिले त्यामुळे जोमाने पक्षकार्य करीन, असे ते म्हणाले. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावरील हल्ल्यासंदर्भात विचारले असता कानडे म्हणाले, मी हिंसेचे समर्थन करणार नाही. कडव्या शिवसैनिकांची ती प्रतिक्रिया होती. त्यामागे भावनेचा भाग आहे. अन्यायाची भावना आहे. विचाराची लढाई आपणाला मान्य आहे. आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीत स्वारस्य नाही असेही कानडे म्हणाले.

Story img Loader